हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे शनिवारी (दि. २५ जुलै) दुपारी भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका युवकाचा उपचारासाठी नांदेडला नेत असताना मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


प्राप्त माहितीनुसार, हिमायतनगरहून भोकरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच २६ सीपी ८८६० क्रमांकाच्या चारचाकीने सोनारी फाट्यावर उभ्या असलेल्या टीएस १८ जी १८१७ आणि एमएच २६ बीएस ५२६९ या दोन दुचाकींना धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



अपघातात शेख जिकरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर, दोघेही रा. सोनारी, हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करून जखमींना सरसम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी दोघांना नांदेडला हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच शेख सोहेल शेख जहीर यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शेख जिकरान यांच्यावर उपचार सुरू आहेत.



अपघाताची माहिती मिळताच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार नागरगोजे, बालाजी जाधव, पठाण आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
“परवाच टाकराळा बु. फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांनी आपला जीव गमावला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी तेलंगणातील निर्मल येथून आपल्या मूळ गावी सोनारी येथे आलेल्या या दोन युवकांवर काळाने पुन्हा घाला घातला. हे दोन्ही युवक एकाच कुटुंबातील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अवघ्या तीन दिवसांत या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण सोनारी गावावर शोककळा पसरली असून, या कुटुंबाचे दुःख शब्दांत मांडणेही कठीण आहे.”

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कधी? सोनारी फाट्यासह हिमायतनगर–भोकर महामार्गावरील विविध गावांच्या चौकांमध्ये आणि बसथांब्यांजवळ वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत आहे. विशेषतः सोनारी फाट्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महामार्गावर वाहनांचा वेग वाढत असताना संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ‘आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन आणि महामार्ग विभाग जागा होणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून, सोनारी फाट्यावर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

