Thursday, May 28

CITU : सीटू संलग्न आशा गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे भोकर तालुका अधिवेशन संपन्न

नांदेड| राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक व अस्थि समाधी भोकर येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे अधिवेशन १० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समितीचे अध्यक्ष बाबुराव पाटील सोनारीकर यांचा फेडरेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या.अधिवेशनाचे प्रस्ताविक उषाताई शिंदे यांनी केले. अधिवेशनाचे उदघाटन फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षा कॉ.शीलाताई ठाकूर यांनी केले.

अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून सीटूचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कामगार नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी जन सुरक्षा कायदा हाणून पाडण्यासाठी एकजुटीची गरज आहे असे सांगितले. ब्रिटिशांच्या रोलेट ऍक्ट काळ्या कायद्याप्रमाणे फडणवीस सरकारने महाराष्ट्रा मध्ये काळा कायदा पास केला असून तो जन आंदोलनापुढे टिकणार नाही असे मनोगत कॉ.गायकवाड यांनी व्यक्त केले. सीटू नांदेड जिल्ह्याचे पदाधिकारी कॉ.दिलीप पोतरे यांनी अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. कॉ.उज्वला पडलवार यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने देण्यात आलेला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे त्यांचा तालुका कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

आभार रेणुका ताई देशमुख यांनी मानले. भोकर तालुका नूतन कमिटी खालील प्रमाणे एक मताने निवडण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रेणुका देशमुख, सचिवपदी कविता दिवटे, कार्याध्यक्षपदी जयश्री इंगळे, उपाध्यक्षपदी उषा शिंदे, शेषाबाई पंतुलवाड, निर्मला गायकवाड,नंदिनी गजभारे तर सहसचिव पदी वनिता टिप्रेसवार, अनिता झम्पलवाड,सुवर्णा अन्कमवार, मंगल राऊत कोषाध्यक्षपदी प्रेम लता ढोरे यांची एक मतांनी निवडकरण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी भोकर तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक ताईंनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!