हिमायतनगर, अनिल मादसवार | अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या समाप्तीनंतर अभ्यंगस्नानाने हिमायतनगर शहरात वारकरी संप्रदायाच्या महिला-पुरुष भजनी मंडळाने काकडा दिंडीचा शुभारंभ केला आहे. सकाळच्या रामप्रहरी टाळ-मृदंगाच्या निनादात “हरी नाम” घुमू लागल्याने दिवाळीच्या पर्वकाळात संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.


शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धा-भावनेने पाळली जाते. सकाळच्या प्रहरी टाळ-मृदंगाच्या गजरात काढल्या जाणाऱ्या काकडा दिंडीत सहभागी होऊन देवी-देवतांचे दर्शन घेतल्याने मोक्ष मिळतो, अशी जनमान्यता आहे. श्री परमेश्वर मंदिर, महाकाली मंदिर आणि कालिंका मंदिर या प्रमुख देवस्थानांमधून ही दिंडी काढली जाते. टाळ-मृदंग, आरती आणि भक्तिगीतांच्या सान्निध्यात अबालवृद्ध आणि बालकही भगवा झेंडा हाती घेऊन दिंडीत सहभागी होतात.


गृहिणी पहाटे सडा-सारवण करून, रांगोळीने घराची शोभा वाढवून दिंडीचे स्वागत करतात. तर अनेक महिला मंडळी मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होतात. विविध भक्तिगीते व आरत्या गात ग्रामस्थांना जागविण्याची ही एक सांप्रदायिक परंपरा आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरून घुमणाऱ्या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. काकडा दिंडीचा हा कार्यक्रम जवळपास महिनाभर सुरू राहतो. जसजशी गुलाबी थंडी वाढते तसतशी भक्तांची संख्या देखील वाढत जाते — हेच या दिंडीचे खास वैशिष्ट्य आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पालखी मिरवणूक व भव्य महाप्रसादाने या दिंडीचा समारोप होतो.



जुन्या जाणकारांच्या मते, पहाटे चालण्याची ही परंपरा आरोग्यदायी संस्कृतीशी निगडित आहे. भक्तीबरोबरच आरोग्याचा संदेश देणारी ही वारकरी परंपरा आजही हिमायतनगरात उत्साहात जपली जात आहे. या दिंडीत वारकरी संप्रदायातील महिला-पुरुष भाविक, युवक, बालक तसेच विविध भजनी मंडळांचे कार्यकर्ते उत्साहात सहभागी होत आहेत. कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही दिंडी देवी-देवतांचे दर्शन घेण्यासाठी निघणार आहे.


