हिमायतनगर, अनिल मादसवार| धुलीवंदन आणि रंगपंचमी सणाचे औचित्य साधत हिमायतनगरातील बाजारपेठ रंगांनी न्हाऊन निघाली आहे. महाशिवरात्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात आणि परिसरात विविध रंगांचे स्टॉल, आकर्षक पिचकाऱ्यांची दुकाने आणि गोडधोडाच्या वस्तूंनी बाजार सजला आहे.

लाल, गुलाबी, हिरवे, पिवळे असे विविध प्रकारचे सुगंधी व हर्बल रंग ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आकाराच्या पिचकाऱ्या, टँकर पिचकारी, गन पिचकारी यांची मोठी मागणी दिसून येत आहे.

यासोबतच होळीच्या पारंपरिक पदार्थांसाठी लागणारे खारीक, खोबरे, साखरेच्या गाठी, बत्ताशे आणि पूजेसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहे.


यात्रेच्या उत्साहात होळी–रंगपंचमीचा जल्लोष मिसळल्याने संपूर्ण शहरात सणसुदीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत असून व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. एकूणच, हिमायतनगरात सण, यात्रा आणि रंगोत्सव यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळत आहे.


