हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर शहरातील आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिरात मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या काकडा आरती उत्सवाचा समारोप सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने शहरातून पालखी दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती.


या भव्य शोभायात्रेत शहरातील महिला, पुरुष, तरुण, लहान बालके तसेच विविध भजनी मंडळींनी मोठ्या श्रद्धा-भावनेने सहभाग नोंदवला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “श्री परमेश्वराचा जयजयकार” घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.


दिंडी मिरवणुकीची सुरुवात मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. प्रारंभी मंदिरात श्री परमेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व भजन सादर करून दिंडीची सुरुवात झाली. त्यानंतर दिंडीने शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, बसस्थानक परिसर, तसेच विविध गल्लीबोळातून मार्गक्रमण केले.



मार्गात नागरिकांनी दिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. या प्रसंगी महिलांनी फुलांच्या रांगोळ्या काढून, आरत्या व भजनांच्या गजरात स्वागत केले. पारंपरिक पोशाखातील मंडळी, ढोल-ताशांच्या निनादात, फुलांच्या सजावटीतील पालखी यामुळे वातावरणात भक्तीभावाची उर्जा पसरली होती.


दिंडीचे पुन्हा श्री परमेश्वर मंदिरात आगमन झाल्यावर भजनी मंडळांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने, रोषणाईने आणि ध्वनीप्रकाश सजावटीने उजळून निघाला होता. संपूर्ण कार्यक्रमात शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, मंदिर कमिटीचे संचालक ग्रामस्थ, आणि भक्तगण उपस्थित होते. या सोहळ्याचे आयोजन श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.


