नांदेड | हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडत आहेत. चैतन्यनगर ते सांगवी या विमानतळ रस्त्यालगत विकसित करण्यात आलेल्या गार्डनमध्ये दररोज शेकडो नागरिक येतात. मात्र देखभालीअभावी हे गार्डन सध्या अडचणींचे केंद्र बनले असून, नागरिकांच्या आरोग्यावरच घाला बसत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.


सहा महिन्यांपूर्वीच टाकण्यात आलेला प्लेव्हर ब्लाॅकचा रस्ता दबला असून ठिकठिकाणी टेकड्या व खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे चालताना घसरण्याचा धोका वाढला आहे. याशिवाय गार्डनमध्ये आवारा कुत्र्यांचा वावर, कचऱ्याचे ढीग, दारूच्या बाटल्या दिसून येत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माॅर्निंग वाॅक ग्रुपने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ३० जानेवारी रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पत्रकार आनंद कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली माॅर्निंग वाॅक ग्रुपची बैठक घेण्यात आली. यावेळी गार्डनच्या विकासासाठी एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. विकसित होत असलेल्या या गार्डनमध्ये मधुमेह, रक्तदाब, पचनविकार तसेच वजनवाढीच्या समस्येचे रुग्ण नियमित येतात. त्यामुळे हे उद्यान स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी ठेवणे अत्यावश्यक असल्याचे आनंद कल्याणकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.



बैठकीस साहित्यिक शेषराव मोरे, जगदीश कदम, सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी अशोकराव पाईकराव, निवृत्तीराव कोकाटे, प्रा. आत्माराम चव्हाण, श्री. दाडगे, सूर्यवंशी तळणीकर, श्री. कुलकर्णी, प्रा. मंगनाळे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

निवेदनात २५ ठोस मागण्या मांडण्यात आल्या असून, त्यात पामवृक्षांच्या जागी नवीन उंच वृक्षांची लागवड, हिरवळीचे सिंचन व खतपुरवठा, किटकनाशक फवारणी, तणनियंत्रण, संरक्षक भिंत, प्रवेश नियम, पाळीव प्राण्यांना बंदी, नियमित साफसफाई, कचराकुंड्या, पुरुष-महिलांसाठी शौचालये, सीसीटीव्ही कॅमेरे व प्रकाशव्यवस्था यांचा समावेश आहे. दरम्यान, ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता, शिवमंदिराच्या पूर्वेकडून गार्डनमध्ये होणाऱ्या लाक्षणिक उपोषणात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माॅर्निंग वाॅक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. गार्डनच्या विकासासाठी हा लढा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

