श्री. गुरु तेग बहादूरजी हे शीख समुदायाचे गुरु होते, ज्यांची शहादत केवळ एका धर्म किंवा समुदायापुरती मर्यादित नसून, संपूर्ण मानवतेसाठी त्याग, धैर्य आणि धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. जेव्हा एका आध्यात्मिक गुरूंनी अन्याय, अत्याचार आणि धार्मिक दडपशाहीसमोर झुकण्याऐवजी आपले शीश अर्पण केले; मात्र आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण होणे साहजिकच आहे. नांदेड येथे होत असलेल्या 24 व 25 जानेवारी 2026 विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.


श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी केवळ शीख समुदायातीलच नव्हे, तर भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक इतिहासातील एक महान विभूती आहेत. त्यांचे जीवन धैर्य, त्याग, करुणा आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहेत. त्यांचा जन्म इसवी सन 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला. ते सहावे शीख गुरु, गुरु हरगोबिंद साहिबजी यांचे धाकटे पुत्र होते. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव गंभीर, शांत आणि आत्मचिंतनशील होता. इतर मुले खेळात रमलेली असताना गुरु तेग बहादूर साहिबजी एकांतात बसून ईश्वरचिंतन व साधनेत आनंद अनुभवत असत. त्यामुळेच पुढे त्यांचे जीवन बाह्य वैभवापेक्षा अंतःशक्ती आणि नैतिक दृढतेचे उदाहरण ठरले.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींनी बालपणी शस्त्र व शास्त्र या दोन्हींचे शिक्षण घेतले. युद्धकौशल्य, घोडेस्वारी आणि तलवारबाजी यात त्यांनी प्रावीण्य मिळवले; मात्र कधीही हिंसा किंवा सत्तेच्या लालसेकडे त्यांचे मन वळले नाही. धर्म व मानवतेच्या रक्षणासाठीच शस्त्रांचा उपयोग अर्थपूर्ण असतो, हे ते जाणून होते. तरुणपणी त्यांनी दीर्घकाळ ध्यान व तपस्येचे जीवन स्वीकारले. त्यांच्या या वैराग्य व त्यागामुळेच त्यांना ‘त्याग मल’ असेही म्हटले गेले. हा त्याग संसारापासून पलायन नव्हता, तर अन्यायापुढे कधीही न झुकणारी आत्मशक्ती निर्माण करण्याचा मार्ग होता.


इसवी सन 1664 मध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी शिखांचे नववे गुरु झाले. त्या काळात भारतातील सामाजिक व धार्मिक वातावरण अत्यंत तणावपूर्ण होते. तत्कालिन शासकाच्या धोरणांमुळे धार्मिक असहिष्णूता वाढत होती. अनेक ठिकाणी जबरदस्तीने धर्मांतर, मंदिरांचा विध्वंस आणि धार्मिक आस्थांवर कठोर निर्बंध लादले जात होते. अशा परिस्थितीत श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे गुरु-पद स्वीकारणे ही केवळ आध्यात्मिक जबाबदारी नव्हे, तर एक मोठे ऐतिहासिक आव्हान होते.

गुरु तेग बहादूर साहिबजींनी आपल्या गुरु-कालावधीत व्यापक प्रवास केला. पंजाबपासून बंगाल, बिहार, आसाम तसेच पूर्व भारतातील अनेक भागांत त्यांनी भ्रमण केले. या यात्रांचा उद्देश केवळ शीख पंथाचा विस्तार नव्हता, तर लोकांमध्ये निर्भयता, आत्मसन्मान आणि ईश्वरावरील खरी श्रद्धा जागवणे हाच होता. ईश्वर एकच आहे आणि सर्व मानव समान आहेत, हे ते शिकवत. जात, धर्माच्या पलीकडे जाऊन सत्य, करुणा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारणे हीच खरी भक्ती आहे, असा त्यांचा संदेश होता.
गुरु तेग बहादूरजींची वाणी अत्यंत गूढ व तात्त्विक आहे. त्यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये संकलित असून त्यामध्ये जीवनाची नश्वरता, मायेची असारता आणि ईश्वरभक्तीचा सखोल संदेश आढळतो. सुख-दुःख, मान-अपमान, भय-लोभ यापलीकडे जो जातो, तोच खऱ्या अर्थाने मुक्त आहे, असे ते सांगतात. आजही त्यांची वाणी माणसाला अंतःकरणाने मजबूत बनण्याची आणि बाह्य परिस्थितींनी विचलित न होण्याची प्रेरणा देते.
गुरु तेग बहादूरजींचे सर्वात महान व ऐतिहासिक योगदान म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले त्यांचे सर्वोच्च बलिदान होय. काश्मीरमधील पंडितांवर जबरदस्तीने दुसरा धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकला जात होता. आपली श्रद्धा, संस्कृती आणि जीवनपद्धती वाचवण्यासाठी ते व्याकुळ झाले होते. जेव्हा ते गुरु तेग बहादूर साहिबजींकडे गेले, तेव्हा गुरुजींनी ही वेदना केवळ एका समुदायाची समस्या मानली नाही, तर तिला संपूर्ण मानवतेच्या व धर्मस्वातंत्र्याच्या प्रश्नाशी जोडले.
कोणत्याही व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे आणि कोणतीही सत्ता हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, असे श्री गुरु तेग बहादूरजींनी ठामपणे सांगितले. भीषण परिणामांची जाणीव असूनही त्यांनी काश्मिरी पंडितांच्या रक्षणाचा संकल्प केला. हा त्यांच्या जीवनातील सर्वात धैर्यशील आणि ऐतिहासिक निर्णय होता.
ही बाब तत्कालिन शासकांच्या दरबारापर्यंत पोहोचताच श्री गुरु तेग बहादूरजींना दिल्लीला बोलावण्यात आले. तत्कालिन शासकांचा धर्म स्वीकारल्यास त्यांचे प्राण वाचतील आणि मान-सन्मान व सुविधा मिळतील, असे सांगण्यात आले. पर्यायाने चमत्कार दाखवण्याची मागणीही करण्यात आली. मात्र गुरुजींनी दोन्ही प्रस्ताव नाकारले. धर्मांतर म्हणजे आत्म्याशी द्रोह, तर चमत्कार दाखवणे म्हणजे ईश्वराच्या नावाचा अपमान, असे त्यांचे मत होते. जीवनाची किंमत मोजावी लागली तरी सत्य आणि विवेकाचा मार्ग स्वीकारण्याचा त्यांनी निर्धार केला.
इसवी सन 1675 मध्ये दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेग बहादूरजींना सार्वजनिकरीत्या शहीद करण्यात आले. त्यांच्या समोरच त्यांचे तीन परम शिष्य भाई मती दास, भाई सती दास आणि भाई दयाल दास यांचा अमानुष छळ करण्यात आला, तरीही गुरु तेग बहादूरजी ठाम राहिले. त्यांनी मृत्यू स्वीकारला; पण आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. भारतीय इतिहासात धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले हे एक अद्वितीय व अनुपम बलिदान आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या शहादतीचा दूरगामी परिणाम झाला. या बलिदानाने हे स्पष्ट केले की भारताची आत्मा सहिष्णुता, विविधता आणि धार्मिक स्वातंत्र्यात दडलेली आहे. त्यांचे पुत्र गुरु गोबिंद सिंहजींनी या शहादतीतून प्रेरणा घेऊन खालसा पंथाची स्थापना केली आणि अन्याय, अत्याचार व असत्याविरुद्ध संघटित संघर्षाचा मार्ग खुला केला. अशा प्रकारे गुरु तेग बहादूरजींचा त्याग येणाऱ्या पिढ्यांसाठी धैर्य आणि आत्मसन्मानाचा शाश्वत स्रोत ठरला.
श्री गुरु तेग बहादूरजींचे जीवन हेही शिकवते की खरा धर्म केवळ आपल्या अनुयायांच्या रक्षणापुरता मर्यादित नसतो. त्यांनी आपले प्राण शीखांसाठी नव्हे, तर हिंदू पंडितांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. यामुळे ते संकुचित धार्मिक सीमांपलीकडे जाऊन एक सार्वत्रिक मानवतावादी व्यक्तिमत्त्व ठरतात. मानवता संकटात असताना खरे संत व महापुरुष वैयक्तिक हितांपेक्षा समाजाच्या हितासाठी उभे राहतात, त्यांचे जीवन हा सक्षम पुरावा होय.
आजच्या काळात, जेव्हा जगातील अनेक भागांत धार्मिक असहिष्णुता, हिंसा आणि द्वेष वाढत आहेत, तेव्हा श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचा संदेश अधिकच सुसंगत ठरतो. भीतीसमोर झुकणे सोपे असते; पण सत्यासाठी उभे राहणे हेच खरे धैर्य आहे, हे त्यांचे जीवन शिकवते. आत्मबल आणि नैतिक दृढता कोणत्याही सत्तेपेक्षा अधिक शक्तिशाली असते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
इतिहास केवळ विजेत्यांनी नव्हे, तर सत्य, धर्म आणि मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांनी घडतो, हाच संदेश गुरु तेग बहादूरजींचे जीवन व बलिदानातून आपल्याला मिळतो. अंधःकारातही मानवतेला प्रकाशाचा मार्ग दाखवला. धर्माचे रक्षण तलवारीने नव्हे, तर धैर्य, करुणा आणि सत्यनिष्ठेने होते, त्यामुळे श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे नाव भारतीय उपखंडात सदैव अमर दीपसारखे प्रज्ज्वलित राहील…
(डॉ. अमरजीत कौंके हे पंजाबी व हिंदी भाषेतील प्रख्यात लेखक असून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.)संपर्क : 9814231698 पटियाला, पंजाब (गुरुद्वारा जन्मस्थान: शिरोमणी संत नामदेव, नरसी नामदेव, हिंगोली यांच्या सौजन्याने)

