बिलोली, गोविंद मुंडकर| अयोध्या येथे भगवान श्रीराम यांच्या मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवशी जन्मलेल्या गोऱ्याचा (गाईच्या पुरुष जातीचे पिल्लू) वाढदिवस दि. २२ जानेवारी रोजी बिलोली तालुक्यात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी मंदिरात मूर्ती स्थापनेचा मंगल प्रसंग आणि याच दिवशी या गोऱ्याचा जन्म झाल्याने या गोऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.


या गोऱ्याच्या वाढदिवसानिमित्त परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी कुटुंबीयांनी गोऱ्याची विधीवत पूजा करून त्यास हार, फुले अर्पण केली. काही ठिकाणी गूळ, चारा आणि फळांचा नैवेद्यही अर्पण करण्यात आला. गोसेवा हीच रामसेवा मानली जात असल्याने या उपक्रमाला धार्मिक तसेच सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.

अयोध्या येथे भगवान श्री राम मुर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेल्या गो-याचा दि.२२ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे कळताच यावेळी बिलोलीचे तालुका पशू वैद्यकीय अधिकारी शंकर उदगीरे, कृषी विभागाचे रिजनल मॅनेजर रमाकांत सोनटक्के, माध्यम प्रतिनिधी बसवंत मुंडकर, भीमराव बडूरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


बिलोली तालुक्यातील शेतीनिष्ठ आणि प्रतिष्ठित शेतकरी मोठ्या संख्येने या गोऱ्याला पाहण्यासाठी व दर्शनासाठी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “श्रीराम मूर्ती स्थापनेच्या दिवशी जन्मलेला गोरा म्हणजे आमच्यासाठी शुभचिन्ह आहे,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काहींनी आपल्या शेतीसाठी, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी या गोऱ्यापुढे मनोभावे प्रार्थना केल्याचे सांगितले.

या गोऱ्यामुळे गावात एक वेगळाच सकारात्मक आणि भक्तीभावाचा संदेश पोहोचत असून गोसंवर्धन, गोपालन आणि भारतीय परंपरेतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. श्रद्धा, संस्कृती आणि शेती यांचा सुंदर संगम या निमित्ताने अनुभवायला मिळत असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

