
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव (नविन) येथे हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या भक्तीगीत आणि टाळमृदंगाच्या गजरात उत्साहात (Ganpati immersion on the ninth day in Andegaon in the traditional manner amidst the sound of Tal-Mridangam) पार पडली.


गणेश उत्सवानिमित्ताने नऊ दिवसापूर्वी गणेश चतुर्थीला येथील युवकांनी हिंदवी स्वराज्य गणेश मंडळ स्थापन करून नवीन आंदेगांव येथे परंपरेप्रमाणे उत्सव साजरा केला. दरम्यान विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्या बरोबर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीत डीजे वा गुलालाची उधळण टाळून पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.


टाळ, मृदंगाच्या वाणीने काढण्यात आलेल्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीने गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमासाठी मौजे आंदेगाव (नविन) येथील बजरंग दल शाखेच्या युवकांसोबत आंदेगावातील महिला – पुरुष भजनी मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. गावकऱ्यांनीही पारंपरिक संस्कृती जपण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले.





