
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील गोळेगाव (तपोवन) येथे अनुक्रमे नांदेड – बिदर व मारतळा ते हळदा मार्गावर असलेल्या दोघा व्यावसायिकांचे हॉटेल व पाणटपऱ्यांचे कुलूप लोखंडी राॅडने तोडले व आत मधील एका ठिकाणचे रोख ४ हजार व हॉटेलातील ५ हजाराचे खाद्यपदार्थ तर दुसऱ्या रोख एक हजार आणि ३ हजाराचे सामान असा एकूण १३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी सोमवारी ( दि.८) रात्री लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले पाहणी केली मात्र अद्याप या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.


उस्माननगर पोलीस स्थानकांतर्गत गोळेगाव येथील नांदेड – बिदर टी पॉइंटवर रामेश्वर कसबे यांचे हॉटेल व पान शॉप असून नेहमीप्रमाणे ते दिवसभर व्यापार करून हॉटेल बंद करून ते घराकडे गेले. मात्र रात्री अंदाजे अकराचे दरम्यान चोरट्याने पान टपरी व हॉटेलचे कुलूप तोडून आतील रोख रक्कम चार हजार व हॉटेलमधील बिस्किट पुडे, शेंगदाणे ,साखर, चहापती पुडे आदीसह पाच हजाराचा माल असा एकूण ९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


तसेच गावतील बसस्थानक येथे विजय जोगदंड यांचे पानटपरीचे कुलूप तोडून रोख चिल्लर १ हजार व साहित्य तीन हजाराचे असा एकूण ४ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याचवेळी टीव्ही दुरुस्ती करणारा टेक्निशियन दत्ता ढाले हे आपल्या दुचाकीवरून उशिरा गावात येत असताना त्यांना पानटपरी व हॉटेलचे कुलूप तोडल्याचे दिसले त्यांनी ही माहिती त्यांनी कसबे व जोगदंड यांना दिली. तर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील शिंदे यांनी पोलिसांना चोरी झाल्याची माहिती दिली.


पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले, मात्र अद्याप या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र गोळेगाव येथील नागरिकांकडून गुन्हा दाखल व्हावा व चोरीचा तपास व्हावा व यानंतर आमच्या गावात चोरीच्या घटना घडूनयेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे व गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस चालढकल करत असल्याचे नागरिकांकडून व चोरी झालेल्या व्यावसायिकाकडून सांगण्यात येते.




