Festivals : चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव
१. चातुर्मास कालावधी आणि महत्त्व
१ अ. चातुर्मास कालावधी - चातुर्मास’, म्हणजे ‘४ मासांचा काळ.’ याचा आरंभ ‘देवशयनी’, म्हणजेच आषाढ शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी होतो आणि ‘प्रबोधिनी’, म्हणजेच कार्तिक शुक्ल ११ (एकादशी) या दिवशी संपतो. या दोन्ही ‘महाएकादशी’ असून अनेक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीला आळंदीची संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाते. पालखीच्या समवेत लक्षावधी वारकरी असतात.
१ आ. चातुर्मासात ‘देवशयनी’ एकादशीच्या दिवशी देव झोपत असल्याने असुरांपासून रक्षण होण्यासाठी त्या कालावधीत व्रत-वैकल्ये केली जातात.
आषाढ मासाच्या पौर्णिमेच्या मागेपुढे ‘पूर्वाषाढा-उत्तराषाढा’ नक्षत्र असते. मनुष्याचे १ वर्ष, म्हणजे देवांची अहोरात्र. ‘दक्षिणायन’ म्हणजे ६ मासांची ‘रात्र’, तर उत्तरायण म्हणजे ‘दिवस’ होय. ‘यथा देहे तथा देवे’, म्हणजे मानवाने ‘आपल्यासारखेच देव आहेत’, ...
