HomeलेखSutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी...

Sutkachaya Savlit Sattechi Bhook : सूतकाच्या सावलीत सत्तेची भूक: सुनेत्रा ताईंनी जबाबदारी निवडली की भाजपाची वंगाळ रणनीती

महाराष्ट्राच्या राजकारणात दुःखद आणि अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह इतर पाच जणांचा बारामतीजवळील विमान अपघातात मृत्यू झाला. अवघ्या तीन दिवसांत ३१ जानेवारीला त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सूतकाच्या काळात सत्ता स्वीकारणे हे धैर्य आहे की राजकीय संधीचा फायदा?

अजित पवारांच्या अकाली निधनाने एनसीपी (अजित पवार गट) मध्ये पोकळी निर्माण झाली. महायुती सरकारमध्ये पक्षाचा वाटा व सत्ता टिकवण्यासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी सुनेत्रा ताईंना पुढे केले. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या. “अजितदादांच्या सप्नांना साकार कराल.” हे सकारात्मक चित्र आहे असे सोईस्कपणे दाखवून वारसा जपणे, विकासासाठी जबाबदारी घेणे, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणे या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले. संपूर्ण राज्यात अजित दादाच्या दुःखद निधनाने तयार झालेली सहानुभूतीची लाट तीन दिवसात संपुष्टात आणण्यात महत्वकांशी राजकारणी यशस्वी झाले.

पण सूतकाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेणे हे धार्मिक परंपरांना धक्का आहे. हिंदू रीतिरिवाजांनुसार १०-१३ दिवस शोक पाळला जातो. अंत्यसंस्काराची राख थंड होण्याआधी कुर्सीची ही जलदबाजी का? असा प्रश्न विचारत विरोधक संजय राउत आणि खुद्द शरद पवार यांनी तीव्र टीका केली: “शोक विसरून कुर्सीची भूक?” शरद पवारांनी स्पष्ट केले.”मला माध्यमांमधून कळले, कुटुंबाशी चर्चा झाली नाही.” हे राजकीय दबाव दाखवते.

नियंत्रण आणि भाजपाची वंगाळ रणनीती येथे दिसते. २०२३ पासून अजित पवारांच्या फुटीचा फायदा घेऊन एनसीपीला ताब्यात ठेवणे, आता सुनेत्रा ताईंना पुढे करून फूट कायम ठेवणे.ही ‘वंगाळ’ रणनीती आहे का? वित्त मंत्रालय सोडून इतर विभाग सुनेत्रा ताईंना दिले, पण सत्तेचे गणित जनभावनांना डावलते.

सुनेत्रा ताईंच्या दृष्टिकोनातून हे सोपे नव्हते. त्यांनी म्हटले: “अजितदादांच्या कार्याला पुढे नेणे ही जबाबदारी.” सत्ता टाकता येत नाही,हेही सत्य आहे. पण सूतकाच्या सावलीत सत्ता स्वीकारणे हे धैर्य आहे की संधीवाद?

जनतेच्या भावना, धार्मिक परंपरा आणि राजकीय जबाबदारी यांच्यातील हे संतुलन किती काळ टिकेल? महाराष्ट्राच्या राजकारणात हे नवे अध्याय असून शोकाच्या राखेतून उगवलेले आहे. महाराष्ट्रातील जनतेने व वाचकांनीच ठरवावे: जबाबदारी की भूक? इथे सत्ता ही व्यक्तिगत महत्वकांक्षा आणि विकासाचे साधन मानली जाते तर एकीकडे माकपाच्या ज्योती बसू सारखे वैचारिक टोक आहे, ज्यांनी पंतप्रधान पद नाकारलेले असते.

१९९० आणि १९९१ (राजीव गांधींच्या दोन ऑफर्स) – १९९० मध्ये वी.पी. सिंह सरकार पडल्यानंतर राजकीय अस्थिरता होती. राजीव गांधींनी ज्योती बसूंना पंतप्रधानपदाची ऑफर दिली, परंतु मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोने नकार दिला. यानंतर देवी लाल आणि चंद्रशेखर यांना विचारण्यात आले, आणि शेवटी चंद्रशेखर पंतप्रधान झाले (काँग्रेसच्या पाठिंब्याने) – १९९१ मध्ये चंद्रशेखर सरकार अपयशी ठरल्यानंतर पुन्हा राजीव गांधींनी ज्योती बसूंना संपर्क केला. बसूंनी पक्षाकडे निर्देशित केले, आणि पक्षाने पुन्हा नकार दिला. हे माजी सीबीआय डायरेक्टर अरुण प्रसाद मुखर्जी यांच्या आत्मचरित्रात उल्लेखित आहे. १९८९-९१ च्या काळात माकपला तीन ते चार वेळा पंतप्रधान पदाचा प्रस्ताव आल्याचा उल्लेख आहे.

१९९६ (युनायटेड फ्रंट सरकारची ऑफर) १९९६ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि भाजप दोघांनाही बहुमत नव्हते. युनायटेड फ्रंट (वामपंथी आणि इतर पक्षांची आघाडी) ने बसूंना पंतप्रधानपदाची ऑफर दिली. बसू स्वतः इच्छुक होते, पण भाकप (मा)च्या केंद्रीय कमिटीने नकार दिला. कारण: कोअलिशनमध्ये मार्क्सिस्ट धोरणे लागू करणे शक्य नाही, आणि वैचारिक शुद्धता टिकवणे आवश्यक आहे.यानंतर एच. डी. देवेगौडा पंतप्रधान झाले. हे माकपच्या कठोर अनुशासनाचे उदाहरण आहे, ज्यामुळे पक्षाने सत्ता स्वीकारली नाही. १९८४-८५ (इंदिरा गांधी हत्येनंतर) इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले, आणि बसूंच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा झाली.

महाराष्ट्रातील पक्ष (जसे काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, भाजप) वैचारिकदृष्ट्या इतके कठोर नाहीत. इथे सत्ता ही व्यक्तिगत महत्वाकांक्षा आणि विकासाचे साधन मानली जाते. उदाहरणार्थ, अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे “आदेश” नाकारून स्वतंत्र भूमिका घेतली आणि सत्ता मिळवली. कम्युनिस्ट पक्षासारखी केंद्रीय अनुशासनाची संस्कृती इथे कमी आहे, ज्यामुळे नेते अधिक लवचिक व सत्तेसाठी हपापलेले असतात. हे भारतीय राजकारणातील विविधता दाखवते.एकीकडे वैचारिक टोक (जसे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), दुसरीकडे व्यावहारिकता (महाराष्ट्रातील उपरोक्त पक्ष).

हे ज्योती बसूंच्या पक्षनिष्ठेचे वैचारिक शुद्धता आणि अनुशासनाचे भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील महत्वपूर्ण उदाहरण आहे, जिथे सत्ता ही धोरणासाठी साधन नव्हे तर धोरणे बदलण्यासाठी असावी. परंतु महाराष्ट्रात पक्ष फोडून किंवा स्वतंत्र भूमिका घेऊन सत्ता मिळवतात. सत्ता ही व्यक्तिगत महत्वकांक्षा आणि विकासाचे साधन मानली जाते, आणि भाजपाची वंगाळ रणनीती इथे यशस्वी होते. “इतकेच मला जाताना… सरणावर कळले होते… मरणाने केली सुटका… जगण्याने छळले होते”

लेखक-कॉ.गंगाधर गायकवाड,नांदेड. मो. 7709217188

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments