हिमायतनगर, अनिल मादसवार| डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आणि आंबेडकर घराण्याचे करारी नेतृत्व हिमायतनगरात उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः दणाणून गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पणतू, राज्यातील युवा आयकॉन सुजातसाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विशाल हनवते यांच्या प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक ७ मधील सभेत सहभाग घेताच संपूर्ण शहराचे लक्ष तिकडे वेधले.


सुजातसाहेबांचे आगमन म्हणजे जणू झंझावाताचं आगमन सभेतील उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि समाजाचा उसळलेला जीवंत प्रतिसाद पाहता वातावरण क्षणात तापले. “आंबेडकर घराण्याचे पाऊल आज हिमायतनगरात पडले… समाजबांधवांसाठी हा क्षण भावनिक ठरला. सुजात दादाच्या उपस्थितीने समाजाची अनेक वर्षांची शांतता आणि मरगळ दूर झाली. त्यांच्या शब्दांतील प्रांजळपणा आणि लढाऊ आत्मा पाहून सभागृहातील नागरिक अक्षरशः भारावून गेले.


काँग्रेसवर तुफानी हल्लाबोल — “समाजाशी विश्वासघात केला!”
आपल्या भाषणात सुजात दादांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत म्हटले कि, “वंचित बहुजन आघाडीसोबतची युती तोडणे हा राजकीय निर्णय नाही… समाजाशी केलेला विश्वासघात आहे!” तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले कि, “येत्या निवडणुकीत मतपेटीतून काँग्रेसला धडा शिकवा. जयश्रीताई विशाल हनवते यांना प्रचंड मतांनी विजयी करा!” त्यांच्या भाषणातून उमटलेली खदखद आणि लढ्याची तीव्रता पाहून उपस्थित जनसमुदायाची मनं हेलावून गेली.



भावनिक व वैचारिक लाट — समाजाचा एकमताने निर्णय
सुजात दादाच्या दमदार हाकेनंतर वॉर्ड ७ मध्ये एक नवीन ऊर्जा उसळली आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे दुर्लक्ष अनुभवले, अपमान सहन केला त्या समाजाने आता एकमुखाने निर्णय घेतला.“या वेळी मतदान वंचित बहुजन आघाडीलाच!” या लाटेने प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची जमीन हलल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विशाल हनवते ठरले विजयी दावेदार — सुजातसाहेबांचा भक्कम पाठींबा
विशाल हनवते हे हाडामासाचे, जमिनीवरचे, लोकांच्या कामात सदैव पुढे असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. निवडणुकीच्या काळातच नव्हे तर वर्षभर लोकसेवेसाठी धावून जाणाऱ्या हनवते यांना सुजात आंबेडकरांच्या थेट पाठिंब्यामुळे आता विजयाची संधी अधिक मजबूत झाली आहे. सभेमुळे निर्माण झालेली भावनिक आणि वैचारिक लाट, समाजातील नव्याने जागृत झालेला स्वाभिमान आणि सुजात दादांच्या प्रभावी आवाहनामुळे वॉर्ड ७ मध्ये वंचित बहुजन आघाडीची विजयाची पताका फडकणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.



