नांदेड| भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज महाआयटी या ऑनलाईन प्रणालीद्वारे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची महाविद्यालयीन उपस्थिती (‘B’Statement) महाआयटी या ऑनलाईन प्रणालीवर समाविष्ट करावी. त्यानंतर त्याची मूळ प्रत समाज कल्याण कार्यालयातील स्वाधार विभागात लवकर जमा करावी. जेणे करून पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.


राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जून 2018 व 26 डिसेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही राबविण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महाविर चौक मार्गावर 10 ते 16 ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी शासकीय ध्वजारोहण समारंभ सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीकोनातुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा-जिल्हाधिकारी कार्यालय-महात्मा गांधी यांचा पुतळा ते महाविर चौक या मार्गावर 10 ऑगस्ट रोजी 24.00 वा. ते 16 ऑगस्ट 2025 रोजीच्या 00.00 वाजेपर्यंत उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे.


या मार्गावर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या काळात उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चा, रॅली, सत्यागृह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध केले आहे. संबंधीतावर नोटीस बजावुन त्यांचे म्हणने ऐकुन घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.


