नांदेड l पंतप्रधान जनविकास कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने गुजरात विद्यापिठात जैन पांडुलिपीशास्त्र केंद्र स्थापन करण्याच्या प्रकल्पास मंजुरी दिली असून, या केंद्रात जैन पांडुलिपींच्या डिजिटायझेशन व संवर्धनासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी खा. अशोक चव्हाण यांना दिली आहे.


माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खा. अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास लेखी उत्तर देताना केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले आहे की, काही विद्यापिठांच्या सहयोगातून अल्पसंख्याक साहित्यिक वारसा जपण्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाने ५ प्रकल्प मंजूर केले आहेत.

त्यामध्ये पारशी व बौद्ध धर्माशी निगडित अवेस्ता, पहलवी, पाली आणि प्राकृत या भाषांवरील संशोधनाला प्रोत्साहन देणे तसेच वारसा भाषा आणि परंपरांचे जतन करण्यासाठी मुंबई विद्यापिठाच्या सहयोगातून, बौद्ध धर्माशी निगडित भारत-केंद्रित दृष्टिकोन विकसित करत सांस्कृतिक वारसा जतन करणे, प्रगत शैक्षणिक संशोधनाला चालना देणे आणि आंतरशाखीय व संस्थात्मक सहकार्यास प्रोत्साहन देण्यासाठी दिल्ली विद्यापिठाच्या सहयोगातून, शिख धर्माशी निगडित गुरुमुखी लिपीचे जतन, प्रोत्साहन आणि अध्यापन करण्यासाठी दिल्लीच्या खालसा महाविद्यालयाच्या सहयोगातून, जैन धर्माशी निगडित पांडुलिपींचे डिजिटायझेशन व संवर्धन करणे, पांडुलिपीशास्त्रातील प्रशिक्षण व संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी गुजरात विद्यापिठाच्या सहयोगातून तसेच शैक्षणिक कार्यक्रम, संशोधन आणि जागतिक सहकार्याद्वारे जैन वारसा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी इंदौरच्या देवी अहिल्या विद्यापिठाच्या सहयोगातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा समावेश आहे.



