नांदेड। एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा वाढदिवस असला की त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सर्व स्तरातील मान्यवर उत्साहीत असतात परंतु महापालिकेत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वाढदिवसा निमित्त त्यांना चक्क 5000 वृक्षबीजे भेट देऊन एक आगळा-वेगळा प्रयोग महापालिकेच्या एका विभाग प्रमुखाने केला आहे.


त्याचे झाले असे की, दिनांक २१.०६.२०२५ रोजी *मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांचा वाढदिवस होता. सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने मनपा आयुक्तांची कार्यालयामध्ये भेट होऊ शकणार नसल्याने नांदेड शहरातील सर्व मान्यवर व्यक्ती तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मनपा आयुक्तांच्या घरीच रांग लावलेली होती. आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी सर्व मान्यवरांनी आप-आपल्या परीने शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मिठाई, पुस्तक अशा विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु महापालिकेतील *स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे* मागील वर्षभरापासून जोपासलेली व वाढवलेली एकूण 5000 वृक्षबीजे यावेळी आयुक्तांना भेट दिली आहेत.

मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून नांदेड शहरात बऱ्याच दिवसापासून “हरित नांदेड शहर” या उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येत आहे, याच अभियानाचा भाग म्हणून महापालिकेतील अधिकाऱ्यांना सुद्धा आयुक्तांनी वृक्षारोपणाचे उदिष्ट ठरवून देऊन प्रत्येक विभाग प्रमुखाने जास्तीत-जास्त वृक्षारोपण करण्यासाठी आदेशित केले आहे. याच उपक्रमातून प्रेरणा घेऊन स्टेडियम व्यवस्थापक रमेश चवरे यांनी मागील वर्षभरात विविध ठिकानाहुन कडुलिंबाची एकूण 5000 वृक्षबीजे एकत्रितपणे स्टेडियम परिसरात जमा केली व त्यांचे संगोपन करून वाढीस घातलेली होती.


वृक्षबीज (seed balls) किंवा रोपे वाढदिवसाची एक अनोखी आणि पर्यावरणपूरक भेट असू शकेल तसेच यामुळे पर्यावरणाची काळजी घेतली जाईल आणि ज्याला भेट दिली आहे, त्याला एक छान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल या विचारानेच आपण ही 5000 वृक्षबीजे मनपा आयुक्तांना वाढदिवसानिमित्त भेट दिली असल्याचे चवरे यांनी सांगितले.

यावेळी मनपा आयुक्तांनी या पर्यावरण पूरक भेटीचा स्वीकार करताना झाडे जीवनाचे, वाढीचे आणि निसर्गाचे प्रतीक आहेत, ज्यामुळे सकारात्मकता आणि आनंद मिळतो. रोपे किंवा वृक्षबीजे दीर्घकाळ टिकणारी भेट आहे, जी वेळोवेळी आठवण करून देतात असे सांगताना या आगळ्या-वेगळ्या भेटीसाठी आभार व्यक्त केले.
वृक्षारोपण ही काळाची गरज असून नागरिकांनी आपल्या परिसराच्या पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असुन. यावर मात करण्यासाठी, वृक्षारोपण हा एक उत्तम उपाय आहे. वृक्ष आपल्याला फळे, फुले, सावली आणि शुद्ध हवा देतात. ते हवामानातील बदल कमी करण्यास मदत करतात. आपले आरोग्य आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्ष आवश्यक आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी किमान एक झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

