नांदेड l सर्व प्रकारच्या शोषणातून समाज मुक्त झाला पाहिजे, आपणाला हा शोषण मुक्तीचा लढा असाच पुढे चालू ठेवावा लागणार आहे असा कानमंत्र लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांनी आपल्या ४८ व्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांना दिला.


येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात प्रा. रामचंद्र भरांडे बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लोकस्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे अध्यक्ष रावसाहेब पवार, व्ही. जी. डोईवाड, काॅ. गंगाधर गायकवाड, सौ. विजयश्री भरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या प्रदिर्घ भाषणात प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीसाठी असलेले १४ हजार कोटीचे बजेट लाडक्या बहिणींसाठी वापरण्यात आले. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थांच्या योजना बंद पडल्या. सर्व मागासवर्गीय महामंडळात खडखडाट निर्माण झाला. अशा परिस्थितीत कुठे गेला आमचा फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा लढाऊ बाणा ? देशात अघोरी हुकूमशाही आली असतांना आमचे कार्यकर्ते कमीशनवर काम करतात. यामुळेच अण्णाभाऊंचा विचार डीजेने मारुन टाकला आहे.


एकट्या नांदेड जिल्ह्य़ातील अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे पाच कोटीचे बजेट होते. त्यातून काय साध्य झाले ? मांगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हायजॅक केले आहे असा घणाघाती आघात करीत प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की, आमची भाषणे लोकांना आवडत नाहीत. आमचे कार्यकर्ते खराब आहेत, असा छुपा प्रचार सातत्याने करण्यात येतो. कार्यकर्ता बदनाम करणे हे भांडवली व्यवस्थेचे षडयंत्र आहे. ही व्यवस्था आपले हस्तक तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असते. हे षडयंत्र आपण वेळीच ओळखले पाहिजे.

कालपरवाच्या अतिवृष्टीत गोरगरीबांच्या घरात पाणी शिरले. प्रस्थापित सुखात आहेत. यासाठी स्वावलंबी समाज निर्माण करावा लागणार आहे. १८ हजार शाळा बंद करुन सरकारने आम्हाला पुन्हा एकदा गुलाम करण्याचा घाट घातला आहे. यासाठी संघटित होऊन न विकता शोषणाच्या विरोधात लढा द्यावा लागणार आहे. कार्यकर्त्यांनी महामानवांचा विचार, आपले कुटुंब आणि समाजाच्या बाबतीत प्रामाणिक रहावे असे आवाहन शेवटी प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केले.
यावेळी डाॅ. व्यंकटेश काब्दे आणि प्रा. रामचंद्र भरांडे यांचा वाढदिवस संयुक्तपणे केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व शेवटी आभार प्रदर्शन धोंडोपंत बनसोडे यांनी केले.
याप्रसंगी लोकस्वराज्य आंदोलनचे जिल्हाध्यक्ष कैलाश सुर्यवंशी, नागोराव कुडके, नागोराव नामेवार, काॅ. अंबादास भंडारे, शाम पिंगळे, माधव गायकवाड, सुनिल जाधव, संभाजीराजे वाघमारे, कृष्णकांत गायकवाड, दयानंद गायकवाड, गणेश वाघमारे, साहेबराव गव्हारकर, संतोष तेलंग, चंपती रेडे, नागोराव कमलाकर, नारायण ईबितवार, गोविंद रेडे, प्रा. इरवंत सुर्यकार, नंदकुमार बनसोडे, सुभाष काटकांबळे आदींची उपस्थिती होती.
आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी येत्या १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व गावातून किमान पाच किलोमीटर चालून जेल भरो आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

