हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील निवघा (बाजार) येथील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवित विसर्जन मिरवणुकीतील डीजे, बँड आणि महाप्रसाद रद्द करून संकलित झालेले 30 हजार रुपये गंभीर आजारी युवकाच्या उपचारासाठी दिले आहेत. गणेश मंडळाच्या सामाजिक दायित्वाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.


हदगाव तालुक्यातील मौजे पळसा येथील विकास दिगंबर धनगरे (वय 22) हा युवक न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त असून, हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असल्याचे समजल्यानंतर निवघा (बाजार) येथील वार्ड क्र. 5 गोकुळनगर मधील श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने या वर्षी श्री गणपतीच्या विसर्जन मिरवणूक निमिताने लावलेला डी. जे. आणि बँड सोबतच महाप्रसाद रद्द करून मंडळाने न्यूमोनिया आणि मलेरियाने ग्रस्त युवकाच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.


त्यांचे हे सामाजिक सायीत्व लक्षात घेता गावातील इतर गणेश मंडळांनीही या कार्यात सहभाग घेतला असून, तर माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब कदम यांनी 5 हजारांची भरीव मदत केली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी यापूर्वी हदगाव येथे घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत गणेश मंडळांना सामाजिक दृष्टिकोनातून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री हिंदवी स्वराज्य गणेश मंडळाने दाखवलेला सामाजिक दायित्व संपूर्ण तालुक्यासाठी व इतर गणेश मंडळासाठी अनुकरणीय ठरला आहे.




