हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील कामारी येथे शेतकरी जोगेंद्र नरवाडे यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत तारेला अचानक शॉर्टसर्किट होऊन सहा एकरातील ऊस जळून खाक झाल्याची घटना भर पावसाळ्यात घडली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महावितरणचा गलथान कारभाराने कळस गाठला आहे, वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. अश्याच वीज पुरवठा चालू बंदच्या घटनेमध्ये दोन तारामध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे भर पावसाळ्याच्या दिवसात ऊसाने पेट घेतल्याने काही क्षणांत संपूर्ण शेतातील जवळपास सहा एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला.



याआधीच अतिवृष्टीमुळे परिसरातील सोयाबीन, कापूस अशी पिके पुराच्या पाण्याने उध्वस्त झाली होती. त्यातच शॉर्टसर्किटमुळे झालेल्या या घटनेने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच माजी आमदार माधवराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.




