हिमायतनगर/नांदेड (विशेष प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव येथील हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान ही जमीन सन 1992 पासून अतिक्रमणाखाली असून, तब्बल तीन दशकांपासून गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी स्वतःची हक्काची जागा मिळालेली नाही. विशेष म्हणजे सदर जमीन ही त्याच कुटुंबाने गावाच्या हितासाठी हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानासाठी दिली होती. मात्र आज दुर्दैवाची बाब अशी की, त्या कुटुंबालाच आणि संपूर्ण गावालाच बेवारस जागेत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.


आंदेगावची लोकसंख्या आज सुमारे 2400 च्या आसपास असूनही, गावात एकही सुरक्षित व अधिकृत अंत्यविधीची जागा उपलब्ध नाही. याबाबत माननीय जिल्हाधिकारी व माननीय तहसीलदार यांचे अतिक्रमण हटवून तात्काळ ताबा देण्याचे स्पष्ट आदेश असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने गावकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भूमिअभिलेख विभागाकडून आतापर्यंत तीन वेळा मोजणी करण्यात आली, मात्र तरीही हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानावरील अचूक अतिक्रमण काढून देण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे गावकऱ्यांना मूलभूत मानवी हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.


अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील प्रसंगी जागा नसणे ही केवळ प्रशासनाची अपयशाचीच नाही, तर समाजासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे समाजसुधारकांनी, लोकप्रतिनिधींनी व संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून अतिक्रमण हटवावे व गावकऱ्यांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमी व कब्रस्तानाचा ताबा द्यावा, अशी जोरदार मागणी आंदेगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


ही केवळ जमिनीची लढाई नसून, मृतालाही सन्मानाने अंत्यविधी करण्याचा अधिकार मिळावा, हीच आंदेगावच्या जनतेची आर्त हाक आहे. या बाबीकडे आता खुद्द जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष देऊन भूमी अभिलेख विभागाला तातडीने स्मशान भूमीची जागा मोजमाप करून मोकळी करून देण्याचे आदेशित करावे आणि मरणानंतरही प्रेताची होणारी अवहेलना थांबवावी अशी मागणी केली जात आहे.
