हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) श्री परमेश्वर मंदिरात अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू झालेल्या काकड आरती कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी आज, गुरुवारी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे साड्यांचे वितरण करण्यात आले.


गृहिणी पहाटे सडा-सारवण करून, रांगोळीने घराची शोभा वाढवून शहरातून येणाऱ्या काकडा दिंडीचे स्वागत करतात. तर अनेक महिला मंडळी श्री परमेश्वर सह शहरातील इतर मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होतात. विविध भक्तिगीते व आरत्या गात ग्रामस्थांना जागविण्याची ही एक सांप्रदायिक परंपरा जोपासत आहे.



दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री परमेश्वर मंदिरात आयोजित काकड आरती उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भक्तिभावाने आरती, भजन आणि प्रार्थनेत सहभाग घेणाऱ्या महिलांचा सन्मान म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, तसेच ट्रस्टचे संचालक श्रीमती लताताई पाध्ये, विलास वानखेडे, मारोती लुमदे, वऱ्हाडे सर, अविनाश संगणवार, लिपिक बाबुराव भोयर, अनिल सूर्यवंशी आदिसह, मंदिर कर्मचारी, महिला-पुरुष भजनी मंडळी आणि काकड आरतीत सहभागी झालेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट तर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले असून, मंदिर ट्रस्टच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.


काकडा दिंडीच्या सुरुवातीच्या काळात भजनी मंडळीना शुभ्र वस्त्र देण्यात आले होते. सकाळच्या प्रहरी टाळ-मृदंगाच्या गजरात काढल्या जाणाऱ्या काकडा दिंडीत भजनी वारकरी मंडळी सहभागी होऊन देवी-देवतांचे दर्शन घेत काकडा दिंडीत सहभागी होत असल्याचे चित्र सर्वांनी पहिले आहे, एकूणच महिलांची काकडा आरती व पुरुष भजनी मंडळीच्या काकडा दिंडीने शहरात भक्तिमय व मंगलम वातावरण निर्माण झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.


