हिमायतनगर (प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त हिमायतनगर येथे आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप गुरुवारी शहरातून भव्य रामधून दिंडी व नामजप सोहळ्याने करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


गेल्या सात वर्षांपासून हिमायतनगर येथे गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सात दिवसीय सुसंस्कार शिबिराचे आयोजन करत आहे. यंदाचे शिबिर २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान पार पडले. या शिबिरामध्ये हिमायतनगर तालुक्यातील २० गावांतील मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. शिबिरात विद्यार्थ्यांना “आपले संस्कार” या विषयासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.


यामध्ये ग्रामगीता काळाची गरज, प्लास्टिक मुक्ती व पर्यावरण संवर्धन, खेळ – कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, क्रिकेट, कृषी व उद्योग मार्गदर्शन, गोपालन, व्यसनमुक्ती, आर्मी भरती मार्गदर्शन, तसेच राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आली. शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणून श्रीराम वाळके, वैराग्यमूर्ती चैतन्य महाराज, ह.भ.प. ग्रामगीताचार्य वेदांत महाराज, ह.भ.प. गोपाळ महाराज मुळझरेकर, शुभांगी ताई दाभोळे, आणि भाऊसाहेब बराटे यांची उपस्थिती लाभली.


शिबिराच्या आयोजनासाठी गोविंद पाटील, विठ्ठल देशमवाड, परमेश्वर इंगळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक सामुदायिक प्रार्थना मंदिर, हिमायतनगर येथे पार पडला. या वेळी अनेक विद्यार्थी, पालक व गुरुदेव सेवा मंडळाचे भक्तगण उपस्थित होते.




