श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी अभ्यासकेंद्रास शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत नांदेड विभागीय केंद्रातून प्रवेश संख्येमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. तुळशीदास गुरनुले आणि केंद्रसंयोजक तथा उत्तम राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड यांचा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माहूर परिसरातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच मुंबई , पुणे येथील कंपनीमध्ये नोकरी करून संसार चालविणाऱ्या युवांचे शिक्षण अर्धवट राहू नये, त्यांनाही दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता यावे या उदात्त हेतूने बळीराम पाटील मिशन मांडवी चे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांनी २००४ मध्ये या अभ्यासकेंद्रास मान्यता मिळवून दिली. प्रारंभी बी.ए, बी.कॉम पासून सुरूवात झालेल्या अभ्यासकेंद्रात आज बी.एसस्सी, एम.ए. ,एम.एसस्सी, एम. कॉम, बालसंगोपन, शालेय व्यवस्थापन पदविका इ. अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. आजमितीस ३०,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन शासनाच्या विविध सेवेत कार्यरत आहेत.
या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख, नांदेडचे विभागीय संचालक डॉ. यशवंत कल्लेपवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास नांदेड विभागांतर्गत जवळपास सर्वच अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक उपस्थित होते.
अभ्यासकेंद्राच्या या सत्काराबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड, सचिव सौ. संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोरजी जगत, कोषाध्यक्ष नेहाताई राठोड, सहसचिव नकुलजी राठोड यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त करून यापुढेही नियमित शिक्षणाबरोबरच दूरस्थ अभ्यासक्रमांच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला तथा प्राचार्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.