श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी काल जोरदार शक्ती प्रदर्शन करत २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला असून हुतात्मा गोडराजे मैदान येथून ढोल ताशाच्या गजरात रॅलीस प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये ग्रामीण भागातील नागरिक व महिलांनी प्रचंड गर्दी केली. यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना माजी आ. प्रदीप नाईक यांनी भारताची लोकशाही वाचविण्याची ही निर्णायक वेळ असल्याचे सांगत शोषित वंचित समाजाच्या कल्याणासाठी तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर शिका मारून महाविकास आघाडीला प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
किनवट विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर माजी. आमदार प्रदीप नाईक यांनी किनवटचा गड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. यानिमित्त एन के गार्डन समोरील भव्य मैदानात ऐतिहासिक रॅली आयोजित केली होती. किनवट शहरातील हुतात्मा गोंडराजे मैदानातून ढोल ताशांच्या गजरात व हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत रॅलीस प्रारंभ झाला.
ही रॅली बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज चौक,जिजामाता चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यँत पोहचली.किनवट माहूर तालुक्यातील गाव,वाडी तांड्यातून हजारो जनसमुदाय हातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे झेंडे व पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत या रॅलीत सहभागी झाले होते. यानिमित्त आयोजित केलेल्या सभेत माजी मंत्री खा.सूर्यकांताताई पाटील, माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, युवानेते कृष्णा पाटील आष्टीकर, काँग्रेस कमिटीचे ता. अध्यक्ष के. सूर्यकांत रेड्डी, युवानेते सुभाषबाबु नायक राठोड, गिरीश नेम्मानीवार, के. मूर्ती, किशन दामा राठोड, शिवसेनेचे व्यंकट भंडारवाड, अब्दुल जान कादर जान यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले की, गेल्या पंधरा-वीस वर्षापासून किनवट माहूर तालुक्यातील जनता माझ्यावर अतोनात प्रेम करत आली आहे. हा प्रचंड जनसमुदाय सत्ता परिवर्तनासाठी उपस्थित झाला आहे.
अवघ्या दहा वर्षातच महायुती सरकारला जनता वैतागली.या सरकारने विकासाऐवजी शोषित उपेक्षित वंचित व अल्पसंख्या समुदायाप्रती विद्वेशाचे राजकारण केले. महागाई बेरोजगारीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. एका बाजूने लाडकी बहीण योजना किसान सन्मान निधीच्या माध्यमातून महिला व शेतकऱ्यांना तूटपुंजे अनुदान द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढून दिलेल्या अनुदानाची वसुली करायची हे या सरकारचे खरे धोरण आहे.
जाती धर्माच्या नावाखाली दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य केले जात असल्याने संविधानिक लोकशाही टिकण्याचीही निर्णायक वेळ आली असल्याचे सांगत या वेळेला महायुती सरकारच्या कोणत्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडू नका.तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर शिक्का मारून महाविकास आघाडीला विजयी करा असे आवाहन प्रदीप नाईक यांनी केले आहे.
यावेळी माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, कृष्णा पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या भाषणातून देशातली आणि राज्यातली विदारक अवस्था मांडून महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देण्याचे आवाहन केले.या वेळी धनलाल पवार, नारायण मिठू राठोड, इंदल राठोड व सुरेश रंगनेणीवार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. या सभेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटासह घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.