उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत केद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे सर यांची बदली झाल्यामुळे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयाप्रमाणे दरमहा प्रत्येक केंद्रामध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सूचित केलेले आहे. त्यानुसार सन २०२४-२५ हे शैक्षणिक वर्ष ‘गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे .
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा परिषदेचा मुख्य हेतू असतो. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून अध्ययन निष्पत्तीवर आधारित वर्गाध्ययन प्रक्रिया प्रभावी करून प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वृद्धी करण्यासाठी प्रत्येक केंद्रस्तरावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. शिराढोण केंद्राची माहे ऑगस्ट २०२४ ची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्र प्रमुख मा. प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.कें. प्रा.शाळा, शिराढोण येथे घेण्यात आली. सदरील शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून शिराढोण नगरीचे सरपंच मा. खुशाल पाटील पांडागळे, मा. जयवंतराव काळे (केंद्र प्रमुख, बिलोली) मा. प्रवीण पाटील (केंद्र प्रमुख, शिराढोण ),मा. शिवाजी पवळे (मु.अ.) मा. शिवसांभ गणाचार्य* ( सुलभक) मा. विकास राठोड (मु.अ.) यांची उपस्थिती होती.
सुरूवातीला ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर इयत्ता २ री, ७ वी इयत्तेतील काही विद्यार्थीनींनी नृत्यासह स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर जि.प.केंद्रीय प्रा.शा शिराढोण येथून पद्दोन्नतीने केंद्र प्रमुख या पदावर बदली होऊन गेलेले मा. जयवंतराव काळे सर, व शिक्षिका सौ. छाया बोनगुलवार, सौ. कल्पना पडुळे यांना शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दुसऱ्या सत्रात शिराढोण केंद्राचे केंद्र प्रमुख मा.प्रवीण पाटील यांनी शिक्षण परिषदेतील विषयाबाबत प्रास्ताविक करून चर्चा सत्राला सुरूवात केली. त्यांनी प्रशासकीय, शैक्षणिक विषयांवर सांगोपांग चर्चा व मार्गदर्शन केले.
२१ व्या शतकातील भविष्यवेधी शिक्षण या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व त्यांची फलनिष्पत्ती यावर प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तालुकास्तरीय सुलभक मा.शिवसांब गणाचार्य यांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व पायाभूत वाचन व संख्याज्ञान यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर, बाबाराव विश्वकर्मा यांनी राष्ट्रीय संपादणूक चाचणी अहवालाचे वाचन व ग्रंथालयासाठी पुस्तक निर्मिती या उपक्रमाविषयी माहिती दिली.ईन्स्पायर अवार्ड यावर शंकरराव काळेवाड तर सौ.येणूरे मॅडम, सौ.मानकोसकर यांनी ‘विद्याप्रवेश’ विषयांवर सांगोपांग माहिती सादर केली. शेवटी केंद्रिय मुख्याध्यापक श्री विकास राठोड यांनी शालेय स्तरावरील प्रशासकीय सुचना देऊन, उपस्थिती बाबत सर्वांचे आभार मानले. सदरील शिक्षण परिषदेसाठी संकूल शिराढोण केंद्रांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेसह, खाजगी व्यवस्थापनाच्य अनुदानित,व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.