देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर जिल्हा परिषद गण मागासवर्गीयांसाठी राखीव असल्याने सध्या या ठिकाणी निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मात्र, या निवडणुकीत शासकीय कर्मचारी व उद्योगपती विविध पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असून, सामान्य जनतेमध्ये नाराजीचे वातावरण आहे. जनतेचा ठाम आवाज असा आहे की, “ज्यांनी पक्षासाठी निष्ठेने आणि ईमानदारीने काम केले, अशाच कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी; उद्योगपती व शासकीय कर्मचारी यांना नाही.”


गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणारे, नेत्यांची सेवा करणारे, जनतेच्या अडचणींमध्ये धावून जाणारे कार्यकर्ते यांना वारंवार उमेदवारीपासून वंचित ठेवले जात असल्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. उलट, जनतेशी फारकत घेतलेले उद्योगपती आणि सरकारी कर्मचारी निवडणूक जवळ आली की मतदारसंघात फिरताना दिसतात. ते जनतेच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा निवडणुकीच्या तयारीतच गुंततात, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


मतदार सांगतात, “हे उद्योगपती व कर्मचारी निवडणूक जिंकले की जिल्ह्याच्या ठिकाणी बसून फक्त पदाचा फायदा घेतात; पण गावात, मतदारसंघात विकासासाठी काहीच करत नाहीत. जनतेच्या पाठिंब्याऐवजी ते फक्त धनशक्तीवर निवडणूक लढतात.”


पूर्वीच्या निवडणुकांमध्ये जनशक्तीने धनशक्तीला हरवलेले उदाहरणही नागरिक देत आहेत. “कै. सुरेश पाटील शेवगावकर विरुद्ध मिसाळे गुरुजी यांच्या सुनबाई यांची निवडणूक आठवते. तिथे जनतेने पैशांवर नव्हे तर जनभावनेवर निर्णय दिला होता,” अशी आठवणही मतदार करत आहेत. त्यामुळे शहापूर मतदार संघातील नागरिकांची ठाम मागणी आहे की, “पक्षांनी धनशक्तीला न जुमानता जनशक्तीवर विश्वास ठेवावा.

पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या, जनतेत राहणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी.” जर यावेळी पक्षांनी पुन्हा उद्योगपती व शासकीय कर्मचारी यांनाच उमेदवारी दिली, तर सामान्य कार्यकर्ते आणि जनतेचा पाठिंबा घेऊन “जनशक्ती विरुद्ध धनशक्ती” अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.


