नवीन नांदेड l जागतिक आपत्ती व धोके निवारण दिनाचे औचित्य साधुन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयातील प्रांगणात दि.१३.१०.२०२५ रोजी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. कोणतीही आपत्ती सांगुन येत नाही मात्र आपत्ती ओढवलीच तर तातडीने करावयाच्या उपाययोजना तसेच आपत्ती येऊच नये यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या मॉकड्रिलला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. याप्रसंगी दुर्घटना घडल्यास व्यक्तींचा बचाव व आग लागल्यास विझविण्यासंबंधी प्रात्यक्षिके करण्यात आली.


आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिनानिमित्त महापालिकेत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केले जाते. या मॉक ड्रिलमध्ये आग लागणे किंवा भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत कसे प्रतिसाद द्यायचे, हे तपासले जाते. नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढायचे आणि मदत कशी पुरवायची, याचे प्रशिक्षण दिले जाते. आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी तपासणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे,हा या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश असतो.या सरावामुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये, याबद्दल मार्गदर्शन मिळते.



याप्रसंगी महानगरपालिकेचे उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा फरहतुल्ला बेग,अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे,कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिव्वे, उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, गौतम कवडे व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




