हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाची निवड गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विनोद गुंडेवार यांनी दणदणीत विजय मिळवला. गुंडेवार यांना १३ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार सुभाष बलपेवाड यांना ५ मते मिळाली. स्पष्ट बहुमताने विजय मिळवत विनोद गुंडेवार यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.


या निवडीबद्दल माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी नगराध्यक्ष शेख रफिकभाई, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दादा राठोड, तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्धन ताडेवाड, शिवसेना तालुका प्रमुख संजय काईतवाड, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, अखिलभाई यांच्यासह काँग्रेस व शिवसेना पक्षाचे विद्यमान नगरसेवक तसेच आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



उपनगराध्यक्षपदाची निवड जाहीर होताच शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. शहरातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढून हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला.


नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार यांनी हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद विसरून सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी मतदारांचे व सहकाऱ्यांचे आभार मानत शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
