नांदेड| नांदेडमध्ये विजातीय प्रेमप्रकरणातून झालेल्या सक्षम ताटे ( वय १९ वर्ष) यांच्या हत्याकांडाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. सक्षमची प्रेयसी आँचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षमच्या पार्थिव देहाशी विवाह केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये पोहोचले आणि सक्षमच्या कुटुंबीयांची भेट घेतली.


सदावर्ते यांनी सक्षमची प्रेयसी आँचलची भेट घेऊन तिला धीर दिला. घटनेच्या दिवशी तिला आरोपीकडून जीवघेणी धमकी मिळाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. घटनेची माहिती घेतल्यानंतर सदावर्ते म्हणाले की, “सक्षम ताटेची हत्या जातीयवादातून करण्यात आलेली अत्यंत क्रूर घटना असून ती संपूर्ण जगाने दखल घेतली आहे.”


सदावर्ते यांनी इतवारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी धीरज कोलमवाड यांनी आरोपी हिमेश मामीडवारला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार “तुझी बहीण लफडे करते, त्याला मार आणि नंतर पोलीस स्टेशनला ये,” असे कोलमवाडने आरोपीला सांगितल्याचे समोर आल्याने त्याच्यावर कारवाई करून खून प्रकरणात आरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.



तसेच FIR मध्ये अनेक उणिवा असल्याने फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब घेऊन नवीन FIR दाखल करण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली. सदावर्ते यांनी सक्षमचे आई-वडील आणि आँचल यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तत्काळ पोलीस सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली असून, मागण्या उद्यापर्यंत मान्य न झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाण्याची चेतावणीही त्यांनी दिली.

खटला लढण्याची तयारी – सदावर्ते
ही घटना व संपूर्ण तपशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे सदावर्ते म्हणाले. तसेच सक्षमचे आई-वडील व आँचल यांनी मागणी केल्यास एडवोकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे सरकारी वकील म्हणून हा खटला लढण्यास तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले.


