हदगाव, गौतम वाठोरे| गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सोमवारी मुंबई येथे नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार हदगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पद “सर्वसाधारण महिला” या गटासाठी राखीव ठरले आहे.


या निर्णयामुळे नगराध्यक्षपदाच्या तयारीत असलेल्या अनेक दिग्गज पुरुष इच्छुकांना मोठा धक्का बसला असून राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक पुरुष नेत्यांनी दीर्घकाळ तयारी केली असताना त्यांच्या आशांवर क्षणात पाणी फिरले आहे.


महिला सत्तेची हॅटट्रिक? हदगाव नगरपरिषदेत याआधीही दोन वेळा महिला नगराध्यक्षा होत्या. यंदाही तीसऱ्यांदा महिला नगराध्यक्षा विराजमान होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक महिला विरुद्ध महिला अशा रंगात रंगण्याची दाट शक्यता आहे.
“महिला सक्षमीकरणाचा निर्णायक टप्पा” — राजकीय वर्तुळात चर्चा – महिला आरक्षणाच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत असून “हदगावमध्ये महिला नेतृत्वाचा प्रभाव वाढणार” अशी चर्चा सुरू आहे. आरक्षण जाहीर होताच नगरातील महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी अनौपचारिक अभिनंदन सुरू झाले आहे.




