नांदेड | नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवेत मोठा दिलासा देणारा टप्पा आज गाठण्यात आला. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पीपीपी (PPP) तत्त्वावर अत्याधुनिक सिटीस्कॅन व एमआरआय सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेचे लोकार्पण राज्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.


यावेळी बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, “या सुविधेमुळे नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व सामान्य रुग्णांना आता खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागणार नाही, माफक दरात आणि दर्जेदार तपासणी शासकीय रुग्णालयातच उपलब्ध होईल.”

आरोग्य सेवेत ऐतिहासिक पाऊल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पीपीपी तत्त्वावर नऊ ठिकाणी सिटीस्कॅन व एमआरआय सुविधा सुरू करण्यात येत असून, नांदेडला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ही सुविधा आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक बदलाची नांदी असल्याचे त्यांनी नमूद केले. या सेवेसाठी विशेष प्रयत्न करणारे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व त्यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी जाहीर अभिनंदन केले. “शासकीय रुग्णालयात दर्जेदार सुविधा निर्माण करणे हेच खरे सामाजिक न्यायाचे कार्य आहे,” असे ते म्हणाले.


पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले की,
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
आयुष्यमान भारत योजना या योजनांतर्गत मोठ्या प्रमाणात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालय परिसरात सेतू सुविधा केंद्र व पोलीस चौकी लवकरच सुरू करण्यात येणार असून, भविष्यात आणखी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

या लोकार्पण कार्यक्रमास खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, बालाजी कल्याणकर, आनंदराव तिडके बोंढारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सिटीस्कॅन व एमआरआय सेवेच्या लोकार्पणा बद्दल समाधान व्यक्त करत, या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सेवा, आयसीयू, ट्रॉमा सेंटर, डायलेसिस सेंटर व कॅथलॅब सुरू करण्याची मागणी केली.
कार्यक्रमात आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर व आमदार आनंदराव तिडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले. शेवटी पालकमंत्री अतुल सावे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

