नांदेड| नांदेड तालुक्यातील काळेश्वर मंदिराजवळील नदी पात्र परिसरात, जलाशयावर, धरण परिसरात जाऊन गर्दी करणे तसेच अनधिकृत बोटिंग चालविणे, बोटींमधून पर्यटकांना बसवून जलाशयामधून फिरविणे, नदीपात्रात स्नान करणे अथवा पोहण्यासाठी उतरणे, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादा रेषा ओलांडून पुढे जाणे, धोकादायक ठिकाणी ग्रुप फोटो, सेल्फी काढणे, इत्यादींना 21 ऑगस्ट रोजी 12 वाजेपासून ते 18 ऑक्टोंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंध केले आहे. (हा आदेश काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी लागू राहणार नाही) आणिबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमीत केले आहेत.


अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते.


तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्य गृहचे अधीक्षक वर्ग-2 ए.पी.खानापुरकर यांनी केले आहे.


वेतन देयकासाठी कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीत नोंदवावी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड मार्फत सुरू करण्यात आले आहे. नियोजन विभागाचे शासन परिपत्रक क्र. असांसं-1324/प्र.क्र.93/का.1417 दि. 19 ऑगस्ट 2024 नुसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2024 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावली मध्ये नोंदविणे आवश्यक आहे.

ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड 02462-252775 ई-मेल dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2024 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक प्रज्ञा प्र. पांढरे यांनी केले आहे.


