नांदेड| सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली दि.३० सप्टेंबर रोजी डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पासून भव्य मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार घालून अभिवादन करून जोरदार घोषणाबाजी करीत मोर्चाची सुरवात करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य अन्नधान्य सेवा केंद्रा मार्फत शेकडो करोड रुपयांची फसवणूक करून फरार असलेला आरोपी बाबासाहेब शंकर सुतारे याला अटक करा, पूरग्रस्तांचे अनुदान तात्काळ पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर वर्ग करा. संघटनेचे अर्ज न स्वीकारनाऱ्या मनपाच्या क्षेत्रीय अधिकारी व आवक जावक लिपिकांवर सेवेतून बदतर्फीची कारवाई करा.
आरोपी सुतारे हा अनेक लोकप्रतिनिधी यांना घेऊन मेळावे घेऊनआमिष दाखवून फसवणूक करीत होता आणि त्यास ज्यांनी प्रोत्साहन दिले त्यांना सहआरोपी करा. बहुतांश पीआरओ हे दलित व मागासवर्गीय असल्यामुळे समाज कल्याण विभागाने हस्तक्षेप करून विशेष निधीची तरतूद करून पीआरओ यांनी सुतारेला दिलेली रक्कम परत करून समाजात सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून आर्थिक मदत करा.
गेल्या वर्षीचे पूरग्रस्तांचे राहिलेले अनुदान तात्काळ वाटप करा. या वर्षीच्या पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणात तलाठी व मनापाचे वसुली लिपिक हे मोबाईल व्हाट्सअपवर बोगस नावे मागवून पूरग्रस्तांची यादी व पंचनामे तयार करीत आहेत. त्यांच्या मोबाईल एस.पी.ऑफिसच्या सायबर सेल मार्फत तपासून दोषींवर कठोर कारवाई करावी.
सीटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने ज्यांनी फॉर्म दाखल केलेत त्यांच्या घरी जाऊन पंचनामे करावेत आणि गृह पंचनामे केले नाहीतर पात्र यादीत टाकून अनुदान देण्यात यावे. वरिष्ठाचे भय नसल्याने अधिनिस्त कर्मचारी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. ही बाब गंभीर असून पीआरओ यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील अनेक महिन्यापासून पूरग्रस्तांचे साखळी उपोषण सुरु असून काहींचे पैसे अजून पडले नसल्याने संपता संपत नाही अशी परिस्थिती आहे. या आंदोलनाचे नेतृत्व सीटू चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.
यावेळी कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, हणमंत सांगळे, प्रवीण वैद्य,कॉ.पंढरी बरुडे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ. नवनाथ सावंत, कॉ.संभाजी सावते,शोभाबाई गिरबीडे, कॉ.चंद्रकांत फुगारे,कॉ.वर्षा कांबळे, कॉ. क्षमा वाघमारे, कॉ. कोमल भोकरे, नागोराव निवडंगे,आदींनी मार्गदर्शन केले. या आंदोलनास किसान जन आंदोलन भारत चे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल यांनी पाठिंबा दिला. जोपर्यंत मागण्या सुटणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहिल असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सांगितले आहे.