नांदेड l मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि वाचकपीठ प्रतिष्ठान अहिल्यानगर , यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या वाचकमेळ्यात रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी नांदेड येथे महाराष्ट्रातल्या मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे. तीन सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमात उद्घाटन , कवितेचे चर्चासत्र आणि निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे.


वाचकपीठ ही केवळ कवितेला वाहिलेली संस्था असून नवोदितांमध्ये काव्य जाणिवा समृद्ध करण्याचे काम ही संथा करते. नांदेडच्या शिवाजीनगर परिसरातील हॉटेल विसावा पॅलेस येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समीक्षक प्रा. भू द वाडीकर हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे राहणार आहेत.


उद्घाटन सोहळ्यात राजारामबापू पाटील ललित कला अकादमी महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक प्रदीप पाटील , साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, वाचकपीठचे अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत भोसले , ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, साहित्यिक देवीदास फुलारी यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.


शेवटच्या सत्रात डॉ वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. मधल्या सत्रात डॉ. प्रज्ञा दया पवार यांच्या हिल्लोळ हरवून आत बाहेरचा या कवितासंग्रहावर चर्चासत्र आयोजित केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. ललिता गादगे या उपस्थित राहणार आहेत. भाष्यकार म्हणून डॉ. पी विठ्ठल, दा गो काळे, डॉ योगिनी सातारकर पांडे आणि दादा ननवरे हे उपस्थित राहणार आहेत. या सबंध कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने भास्कर निर्मळ पाटील आणि महेश मोरे यांनी केले आहे.



