हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा नडवा पूल सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुलाच्या बांधकामात रेतीऐवजी डस्टचा वापर केला जात असल्याचे, तसेच नियमानुसार आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्यांऐवजी ८ मिमी व १० मिमीच्या गजांचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. या हलगर्जी कामामुळे पुलाची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचा आरोप पुलालगतच्या शेतकरी व गावकऱ्यांनी केला आहे.


हा पूल गावासाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र अशा पद्धतीने केलेले काम भविष्यात मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, कामाची देखरेख करणारे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता कानिदे व संबंधित अधिकाऱ्यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गावकऱ्यांनी या कामाची तांत्रिक चौकशी तात्काळ करण्याची, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करावे, पुलाची उंची वाढवावी, बांधकामाची तांत्रिक तपासणी करावी. अन्यथा या कामाविरोधात नागरिक व शेतकरी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


दरम्यान, मागील काळात हिमायतनगर– पळसपूर – डोल्हारी – सिरपल्ली रस्त्याचेही प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे काही दिवसांतच उध्वस्त झाले असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे नडवा पुलाचे कामही त्याच पद्धतीने होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


