औंढा नागनाथ l औंढा नागनाथ येथे सुमारे 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आज अक्षरशः मोडकळीस आले आहे. काळानुसार या निवासस्थानाची कोणतीही दुरुस्ती न झाल्याने सध्या त्याची अवस्था अत्यंत खस्ता झालेली दिसून येत आहे. निवासस्थानातील दरवाजे, खिडक्या निखळून पडल्या असून भिंतींना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. अनेक घरांची छपरे उडून गेली असून परिसरात जंगलासारखी झाडाझुडपांची वाढ झाली आहे.


या झाडाझुडपांमुळे निवासस्थान परिसरात जनावरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून पिण्याच्या पाण्याची व नियमित वीजपुरवठ्याची कोणतीही सोय नाही. अशा परिस्थितीत येथे पोलीस कर्मचारी कसे राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निवासासाठी इच्छुक असलेले कर्मचारीही येथे राहण्यास तयार नाहीत. परिणामी अनेक पोलीस कर्मचारी बाहेर भाड्याच्या खोलीत राहत असून काहींना रोज बाहेरगावावरून अपडाऊन करावे लागत आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी वेळ निश्चित नसल्याने त्यांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. दिवस-रात्र कर्तव्य बजावल्यानंतर गावाकडे जाणे अत्यंत अवघड ठरत असून याचा थेट परिणाम त्यांच्या कामकाजावर व आरोग्यावर होत आहे.


दरम्यान, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या या पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल 147 गावे, वाड्या, तांडे व वस्त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. यामध्ये जवळा बाजार व शिरड शहापूर पोलीस चौकीचाही समावेश झाल्याने कामाचा भार लक्षणीयरीत्या वाढला आहे. पूर्वी औंढा नागनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 79 गावे होती. त्यात आता 54 गावांची भर पडली असून काही गावे इतर पोलीस ठाण्यांत वर्ग करण्यात आली आहेत.

जवळा बाजार (पूर्वी हट्टा पोलीस स्टेशन), शिरड शहापूर (पूर्वी कुरुंदा) व पिंपळदरी (पूर्वी कळमनुरी) ही महत्त्वाची गावे व बिट्स औंढा नागनाथ पोलीस स्टेशनला जोडण्यात आल्यामुळे या पोलीस ठाण्याचे महत्त्व वाढले असले, तरी त्या तुलनेत मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे.
सध्याच्या स्थितीत असलेल्या निवासस्थानात राहणे धोकादायक ठरत असून ना सुरक्षित छप्पर, ना दरवाजे-खिडक्या, ना पाणी, ना वीज अशी अवस्था आहे.
भविष्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तातडीने सुसज्ज, सुरक्षित व सर्व सोयींनी युक्त नवीन पोलीस निवासस्थान उभारण्यात यावे, अशी जोरदार मागणी पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे. यामुळे पोलीस बांधवांची धावपळ थांबून ते निर्धास्तपणे आपले कर्तव्य बजावू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

