नांदेड| भारत सरकारच्या “बालविवाहमुक्त भारत – 100 दिवस संकल्प महाराष्ट्र मोहिमेला” नांदेड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिला व बालविकास विभाग, जिल्हा प्रशासन, विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था तसेच जनसेवा प्रतिष्ठानचा या उपक्रमाला जाहीर पाठिंबा लाभत आहे.


जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. यामध्ये बालविवाह प्रतिबंधक रॅली, प्रतिज्ञा कार्यक्रम, कॅण्डल मार्च, मंदिरांबाहेर बालविवाहमुक्त नोटीस बोर्ड लावणे, धर्मगुरूंमार्फत शपथ, ‘बालविवाहमुक्त ग्राम’ ठराव अशा उपक्रमांचा समावेश आहे.


या मोहिमेचा एक भाग म्हणून राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, नांदेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करणार” असा निर्धार व्यक्त करत सामूहिक शपथ घेतली.


कार्यक्रमास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सौ. विद्या आळणे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तिवडे, शिक्षकवृंद, जनसेवा प्रतिष्ठानचे अरुण कांबळे, जिल्हा समन्वयक निलेश कुलकर्णी, आशा सूर्यवंशी, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या शकीला शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गोपाळ मोरे यांनी केले. नांदेड जिल्ह्याला पूर्णपणे बालविवाहमुक्त करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.



