कंधार, सचिन मोरे| सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्य ,चिंतन , मनन ,वाचन महत्त्वाचे आहे .वाचनातूनच तुमची गुणवत्ता सिद्ध होत असून त्यातूनच अनेक महापुरुष घडली आहेत . वाचनातून व्यक्तिमत्त्वाचा विकास घडतो त्याकरिता युवकांनी आदर्श पिढी घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाचन करावे व स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आपल्या गावचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले .
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त नगरपरिषद संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कंधार येथे १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयीचे निवडक ग्रंथ व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी रामेश्वर गोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शनपर बोलताना गोरे म्हणाले की , डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे फार मोठे शास्त्रज्ञ होते त्यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाले.
हा प्रवास थक्क करणारा असून येणाऱ्या पिढीस डॉ. कलाम यांचे कार्य नेहमीच आदर्शव्रत राहील त्यांचा आदर्श भावी पिढीने जोपासावा असे आव्हान गोरे यांनी केले . यावेळी वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल रफिक सत्तार, पत्रकार सचिन मोरे ,दत्ता ऐनवाड ,मिलिंद महाराज , श्रीमती कमलबाई जाधव , श्रीमती वंदना फुले ,संदीप जाधव यांच्यासह वाचकांची लक्षणीय उपस्थिती होती.