उमरखेड/हिमायतनगर (प्रतिनिधी) उमरखेड तालुक्यातील एका अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या तथाकथित शिक्षकाने फुस लावून लैंगिक अत्याचार केल्याने पीडितेचा मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकरणातील आरोपी शिक्षकास फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी हिमायतनगर तालुक्यातील पद्मशाली समाज बांधवांनी केली आहे.


या संदर्भात तहसीलदार व पोलीस ठाण्यामार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री, जिल्हाधिकारी नांदेड तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याच्यासह त्याचे भाऊ व इतर सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा, विशेष सरकारी वकील नेमावा, जेणेकरून पीडित कुटुंबास त्वरित न्याय मिळेल, अशी अपेक्षा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने पद्मशाली बांधव उपस्थित होते.



