हिमायतनगर, अनिल मादसवार| यंदा जुलै महिन्यापासून हिमायतनगर तालुक्यात सततच्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुर परीस्थीती निर्माण होऊन तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या पावसामुळे पुर येवुन पिके पुर्णपणे जमिनीसह वाहुन गेले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत देण्यात यावी. अशी मागणी नायब तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन पाठवून हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.


यावर्षी हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरस्थितीत अनेक शेतजमिनी पाण्याखाली जाऊन हजारो हेक्टर शेती पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक २४ रोजी शेतकऱ्यांनी निवेदन देऊन, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी देण्यात यावी. शेतकऱ्यांना जाहिर केलेली तुटपुंजी मदत हेक्टरी 50,000/- रुपये दयावी. शासनाने जाहीर केलेली मदत हि एकदम तुटपुंजी त्यामुळे शेतकऱ्याच्या बियाण्याचा खर्चही यातून भरून निघणारा नाही. तसेच पैनगंगा नदिकाठी व नाल्या शेजारील शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहिर करुन त्वरीत आर्थीक मदत वाटप करावी.



हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडुन त्वरीत पिकविमा मिळवुन दयावा. तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करीता मोफत वि-बियाणे व खते देण्यांत यावी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांची फिस पुर्णपणे माफ करण्यांत येऊन शेतकऱ्यांना दिलासा दयावा असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्ताजी भरणे, पालकमंत्री अतुलजी सावे, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतजी पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पाठविले आहे. या निवेदनावर हिमायतनगर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



