हिमायतनगर (अनिल मादसवार) सरसम (दूधड–वाळकेवाडी) व पोटा (सोनरी फाटा परिसर) या दोन्ही बिटमध्ये 2024-25 या कालावधीत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून मजुरांमार्फत नव्हे तर थेट JCB मशीनद्वारे झाडे लावली तर काही ठिकाणी थेट दगडगोट्यामध्ये झाडे लावल्याचे आढळून आले आहे. झाडांमधील अंतर नियमावलीनुसार न ठेवता मनमानी पद्धतीने लागवड करण्यात आली असून, जाळी व दगडी बंधाऱ्यांवर आवश्यक संरक्षणात्मक जाळी बसविण्यात आलेली नाही.



तक्रारदार राजकुमार दगडू पवणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, माती तळी निकृष्ट दर्जाचे असल्याने ती वाया गेली असून, जंगल परिसरात सध्या झाडांची अनधिकृत तोड सुरू आहे. या कामांमध्ये मजुरांचे हक्काचे पैसे रोखून ते संबंधित अधिकाऱ्यांनी JCB मालक व स्वतःच्या फायद्यासाठी वळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात सरसम बिटचे वनपाल व वनरक्षक, तसेच पोटा बिटचे वनपाल व वनरक्षक यांच्यावर थेट बोट ठेवले आहे. संबंधित अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास न राहता नांदेडहून ये-जा करतात, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.



तक्रारदाराने दिनांक 17 सप्टेंबर रोजी रेंजर मगेश पाटील यांच्याकडे JCB द्वारा झाडे लावलेले फोटो व झाडतोडीचे लाईव्ह लोकेशन स्क्रीनशॉट्स सादर केले होते. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे या भ्रष्ट कामास वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचा संशय व्यक्त होत आहे.



तक्रारदार राजकुमार दगडू पवणेकर यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जेसीबीद्वारे झालेले सर्व काम प्रत्यक्ष पाहणीसह व्हिडिओग्राफी करण्यात यावी. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच जंगलात आणलेल्या दोन्ही JCB शासनाच्या ताब्यात घेण्यात याव्यात. अन्यथा या संदर्भात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.




