नांदेड| नागपूर ते नाणीजधाम या पायी दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा जागर संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या वसुंधरा पायी दिंडीला आज १३ वा दिवस पूर्ण झाला असून हिंगोली जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला आहे.


कै. बाबुराव देशमुख विद्यालय, डोंगरकडा (ता. हिंगोली, कळमनुरी) येथे सकाळी साडेसहा वाजता पूजा करून दिंडीचा नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला. त्यानंतर पार्डी (ता. अर्धापूर) येथील केसरिया संभाजी टोलनाक्याजवळ भोकर विधानसभा काँग्रेसचे युवा नेतृत्व तिरुपती पाटील कोंडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण व यात्रेकरूंना नाश्त्याचे वाटप करण्यात आले.


तब्बल ४० दिवसांचा आणि ११२० कि.मी.चा हा प्रवास असून, हजारो श्रद्धाळू यात्रेकरू पायी चालत नाणीजधाम गाठणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण, युवकांद्वारे पथनाट्य सादर करून वसुंधरेचे रक्षण करण्याचा संदेश दिला जात आहे. ही दिंडी धार्मिकतेसोबत सामाजिक संदेश देणारी ठरत असून वृक्षारोपण, संगोपन, स्वच्छता अभियान, कॅरिबॅग मुक्ती आणि वसुंधरेचे रक्षण या विषयांवर जनजागृती घडवून आणत आहे. यात्रेकरू हातात फलक, झेंडे व घोषवाक्ये घेऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत आहेत.



टाळ-चिपळ्यांचा नाद, भजनांचा गजर आणि ‘वसुंधरा माता की जय’, ‘गुरुमाऊली नरेंद्र स्वामी जय जय’, ‘योगिया नाणीजवासी नाथ महंता तूच योगीराया’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले आहे. यात तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून धार्मिक श्रद्धा व पर्यावरण जाणीव यांचा सुंदर संगम घडला आहे.


नाणीजधामापर्यंतच्या प्रवासात ग्रामस्थांकडून दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे. यात्रेकरूंना पाणी, निवारा व महाप्रसादाची सोय करण्यात येत असून लोकसहभागातून ही चळवळ अधिक प्रभावी बनली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही वसुंधरा पायी दिंडी धार्मिक सोहळ्यापलीकडे जाऊन पर्यावरण संवर्धनासाठीची लोकचळवळ ठरत आहे आणि समाजाला नवी दिशा देत आहे.


