नांदेड| शहरातील जुना मोंढा परिसरात घडलेली धाडसी चोरीची घटना संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी ठरली आहे. तेल व्यावसायिक विनायक पारसेवार यांची तब्बल ३५ लाख रुपयांची रोख रकमेची बॅग सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने लंपास केली.


घटनास्थळ पादचारी व व्यापाऱ्यांच्या दाट वर्दळीचा असूनही चोरट्यांनी व्यावसायिक पातळीवर हा डाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. पारसेवार कारमधून घरी जात असतानाच चोरट्यांनी आधीच टायर पंचर करून त्यांना अडवण्याची योजना आखली. वाहन थांबताच एका क्षणात कारच्या दुसऱ्या बाजूने दबा धरून बसलेल्या दोघा चोरट्यांनी कैशची बॅग हिसकावून दुचाकीवरून काही सेकंदात फरार झाले.

घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्गात प्रचंड चिंता पसरली असून सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरी इतक्या व्यस्त परिसरात घडल्याने नागरिकांतही अस्वस्थता वाढली आहे.


माहिती मिळताच वजीराबाद पोलिसांनी तात्काळ विशेष पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी स्वतः घटनास्थळी धाव घेऊन तपासाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा हा धाडसी डाव पोलिसांसाठीही मोठे आव्हान ठरत असून आरोपी जलदगतीने पकडले जाण्याची सर्वत्र मागणी होत आहे.


