नांदेड| संपूर्ण मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवले असून शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतमाल पाण्यात वाहून गेला, जनावरांचा मृत्यू झाला, तर अनेक गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसून संसार उद्ध्वस्त झाला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवसांतच शेतकर्यांच्या माथी दुर्दैव कोसळले असून शेतकरी हताश झाले आहेत.


या परिस्थितीत सरकार केवळ आश्वासन देत आहे, मात्र प्रत्यक्षात मदतीचा ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी टीका स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी केली आहे. शेतकर्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे. नुकसानग्रस्तांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी. गोरगरिबांना अन्नधान्य व निवार्याची सोय करून दिली पाहिजे. सरकारने वेळ न दवडता तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


अतिवृष्टीमुळे शेतीमाल, जनावरे व घरे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत. अनेक शेतकरी दिवाळीचा सण साजरा करण्याऐवजी झालेल्या नुकसानीच्या वेदना सोसत आहेत. या पार्श्वभूमीवर, आश्वासन नको, तर तात्काळ मदत करा, असे ठाम विधान करीत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने शासनाला तातडीची मदत करण्याचे आवाहन केले आहे.




