हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापत असला, तरी दुसऱ्या दिवशीसुद्धा नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर ‘मीच पुढचा नगरसेवक, मीच भावी नगराध्यक्ष’ असे संदेश झळकवत असलेले अनेक इच्छुक मात्र अद्याप अर्ज दाखल करण्यापासून दूर आहेत.


प्रशासन सज्ज, पण उमेदवार मौन –हिमायतनगर नगरपंचायतच्या १७ नगरसेवक पदांसह थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी नामांकन प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे.


नगराध्यक्षपदासाठी एक टेबल आणि नगरसेवक पदांसाठी दोन टेबल अशी सोय करण्यात आली आहे. पंचायत समितीचे ओएस गायकवाड, विस्तार अधिकारी प्रमोद टारफे तसेच देवसरकर, देशपांडे आदी अधिकारी उमेदवारी अर्ज स्वीकृतीसाठी कार्यरत आहेत. मात्र ११ नोव्हेंबर सायंकाळपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.


सोशल मीडियावर उत्साह, प्रत्यक्षात शांतता – शेकडो इच्छुकांनी सोशल मीडियावर आपली तयारी दर्शवली असली, तरी वास्तवात अर्ज दाखल करण्याच्या बाबतीत सर्वच पक्ष आणि गट अद्याप संभ्रमात असल्याचे दिसते. उमेदवारांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांच्या तपासणी, सत्यापन आणि पुरवठ्याच्या प्रक्रियेत अनेकांची धावपळ सुरू आहे. शिवाय कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसल्याने, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांमध्ये ताणतणाव आणि अनिश्चितता कायम आहे.

वार्डांमध्ये गुप्त बैठका आणि ‘प्रचार पार्टी’ – टिकिटांची अद्याप घोषणा न झालेली असली, तरी काही वार्डांमध्ये इच्छुकांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. मतदारांना खूष करण्यासाठी खाण्यापिण्याच्या पार्टी, गाठीभेटी, आणि मतदारसंघात गुप्त चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. “उमेदवाराची जय हो, खाण्यापिण्याची सोय हो!” अशी चर्चा शहरभर रंगली आहे.
जनतेचा नवा मूड – विकास हाच मुद्दा – गेल्या पंचवार्षिक काळात शहरातील रस्ते, स्वच्छता, पिण्याचे पाणी, पथदिवे, घाणीचे साम्राज्य यासारख्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेपेक्षा स्वतःच्या फायद्याला प्राधान्य दिले, असा जनमानसात सूर आहे. त्यामुळे यंदा मतदार राजा अधिक सजग असून, “जो जनतेची सेवा करेल, तोच नगरभवनात बसेल,”
असा निर्धार मतदारांमध्ये दिसत आहे. एकूणच हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचा प्रारंभ राजकीय चुरशीचा आणि संभ्रमाचा संगम बनला आहे. अर्ज दाखल करण्यास आता काहीच दिवस शिल्लक असताना, कोण अर्ज दाखल करतो आणि कोण माघार घेतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
– NNL Digital Media“जनतेचा आवाज, शहराच स्पंदन”


