हिमायतनगर (अनिल मादसवार) आगामी काळात होवू घातलेल्या हिमायतनगर शहर व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) स्वबळावर लढणार असल्याची माहिती तालूकाध्यक्ष अभिषेक लूटे यांनी दिली.


हिमायतनगर तालुक्यातील सरसम व नव्याने पुनर्रचित झालेल्या पोटा बु या दोन जि.प.गट व पंचायत समितीचे कामारी, सिरंजनी, व पोटा, सरसम चार गण व तसेच हिमायतनगर नगरपंचायत निवडणुक ही जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांच्या सह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात येणार असून, सध्यातरी वरिष्ठांकडून कोणत्याही युती च्या संदर्भात गाईड लाईन्स आल्या नाहीत.



जेंव्हा तसे आदेश येतील त्या प्रमाणे फेरबदल होणार असून, तुर्तास तरी स्वबळावर निवडणुका लढण्याचे आम्ही स्थानिक पातळीवर नियोजन करीत आहोत. जिल्हा परिषदेचे दोन्ही गट व पंचायत समितीचे चार गण व तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या १७ प्रभागात उमेदवार निवडीची चाचपनी सुरू असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे तालूकाअध्यक्ष अभिषेक लूटे यांनी सांगितले. यावेळी वामनराव पाटील वडगावकर, ज्ञानेश्वर पंदलवाड, आकाश सुर्यवंशी, अमोल धुमाळे, अभिलाश जैस्वाल आदिंसह अनेकांची उपस्थिती होती.




