नांदेड l नांदेड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. सान्वी जेठवाणी यांनी नांदेडकरांना भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे जोरदार आवाहन केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सक्षम प्रशासनासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांचा थेट लाभ नांदेडकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेत भाजपचा महापौर असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. सान्वी जेठवाणी म्हणाल्या की, नांदेडच्या विकासासाठी राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण तसेच खासदार अजित गोपछडे यांना प्रभावीपणे काम करण्याची संधी नांदेडकरांनी द्यावी. भाजपच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहराचा सर्वांगीण व वेगवान विकास साधता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पायाभूत सुविधा, आर्थिक प्रगती आणि सामाजिक विकासाचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात मा. मुख्यमंत्री देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. हा विकासाचा गाडा नांदेडपर्यंत आणायचा असेल, तर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.


रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व युवक सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती, स्मार्ट सिटी, डिजिटल सुविधा अशा सर्व महत्त्वाच्या विषयांवर भाजप कटिबद्ध आहे. डबल इंजिन सरकारचा लाभ नांदेड शहराला मिळण्यासाठी भाजपचा महापौर आणि मजबूत नेतृत्व गरजेचे आहे, असे डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सांगितले. शेवटी नांदेडकरांना आवाहन करताना त्या म्हणाल्या, “नांदेडचा विकास करायचा असेल, तर पक्षभेद विसरून विकासाला मत द्या. विकासासाठी, सुरक्षित आणि समृद्ध नांदेडसाठी – भाजपलाच मतदान करा!


