नांदेड| १२ डिसेंबर १९८० रोजी स्थापन झालेल्या फेसकॉमचा ४५ वा स्थापना दिवस यंदा विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तसेच उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉम – नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पार पडणार आहे.


यावेळी साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक व सामान्य वाढदिवस साजरा करण्यात येणार असून विनामूल्य सर्व रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १२ डिसेंबर २०२५, सकाळी १०.३० वाजता, स्वातंत्र्य सेनानी डॉ. दादारावजी वैद्य (आर्य) सभागृह, वैद्य रुग्णालय, वजीराबाद चौक, नांदेड येथे होणाऱ्या शिबिराचे उदघाटन शिवानंदजी निमगिरे — जिल्हा सहआयुक्त, समाज कल्याण व सामाजिक न्याय, अध्यक्षस्थानी : मा. डॉ. हंसराज वैद्य — अध्यक्ष, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ व फेसकॉम नांदेड आणि विशेष अतिथी म्हणून डॉ. सुधीर देशमुख — अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, डॉ. संजय पेरके — जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड यांच्या उपस्थितीत शिबिरातील सर्व आजारी व गरजवंत ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस प्रातिनिधिक स्वरूपात सामूहिकरीत्या साजरा करण्यात येणार आहे.


कार्यक्रमानंतर स्वामी समर्थ मंदिर, सोमेश कॉलनी येथे मंदिर अन्नछत्र व संचालक मंडळाच्या वतीने सर्व शिबिरार्थी ज्येष्ठ नागरिकांना नाष्टा-चहापाणी (प्रसाद) देण्यात येईल. तसेच ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्डशी जोडलेला मोबाईल असल्यास, त्यांना इंजी. वामन गाजरे, प्रकाश पत्तेवार व त्यांच्या टीमकडून विनामूल्य आयुष्यमान भारत कार्ड तयार करून मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.


नांदेड शहरातील तसेच उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकॉमच्या सर्व संघातील आधारकार्ड लिंक असलेले मोबाईल धारक ज्येष्ठ नागरिकांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटूरकर, गिरीश बाराळे, रामचंद्र कोटलवार, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पवार काटकळंबेकर, एडवो. एम.झेड. सिद्दिकी, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, डॉ. पुष्पा कोकीळ, डॉ. अंजली चौधरी, सौ. रश्मी वडवळकर व समस्त कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.



