· 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 ला मतमोजणी
· एका शाईत दोनदा मतदान
· मतदान कालावधीत कोणीही कायदा हातात घेवू नये
· शेवटच्या प्रशिक्षणानंतर आज पोलींग पाटर्या होतील रवाना
· आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
नांदेड, अनिल मादसवार| येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लगेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाच्यावतीने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली असून उद्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना शेवटचे प्रशिक्षण देवून मतदानासाठी साहित्यासह पोलींग पाटर्या रवाना करण्यात येणार आहे. तरी मतदारानी जास्तीत जास्त मतदानासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मतदानाच्या कालावधीत काय करावे व काय करु नये याबाबतची माहिती त्यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी राजकुमार माने आदीची उपस्थिती होती. मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्ह्यात सर्व मतदारसंघात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत . त्यामुळे कोणीही कायदा हातात घेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी पाच व पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येणे प्रतिबंधित केले आहे.
मतदारांना मतदान करताना जी विहित कार्यपध्दती आखून दिलेली आहे, त्यानुसार मतदान करावे. ज्या मतदाराकडून मतदान करतानाच्या प्रक्रीयेची छायाचित्र, व्हिडीओ, रिल्स, केल्या जातील त्या समाज माध्यमावर प्रसारित केल्या जातील, अशा मतदाराविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 नुसार तात्काळ, पोलीस कारवाई केली जाईल, याची सर्वानी नोंद घ्यावी. मतदारांनी गोपनीयता राखणे हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 अन्वये मतदारांना बंधनकारक आहे. उक्त अधिनियमाच्या कलम 61 अ अन्वये एखाद्या व्यक्तीने मतदान केंद्रामधून मतदान यंत्र लबाडीने किंवा अनाधिकृतपणे बाहेर नेले अथवा तसा प्रयत्न केला किंवा अशा कृत्यास जाणूनबजून सहाय्य केले किंवा त्यासाठी उद्युक्त केले तर ती व्यक्ती एका वर्षाचा कारावासास किंवा पाचशे रुपयांपर्यंत दंडास किंवा दोन्हीही शिक्षेस पात्र ठरतील यांची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.
एका शाईत दोनदा मतदान
येत्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असून यावेळी 27 लाखांहून अधिक मतदार मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा उभी केली आहे. यामध्ये 3088 मतदान केंद्राची स्थापना केली आहे. या सर्व मतदार बुथवर सर्व आवश्यक असणारी व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे मतदार लवकर कसे मतदान करतील यासाठी विशेष प्रशिक्षण अधिकारी, कर्मचारी यांना दिले आहे. यावेळी सर्व मतदाराना वेगळा अनुभव येणार असून २५ वर्षानंतर नांदेडला एका शाईमध्ये दोनदा मतदान करता येणार आहे. तरी नागरिकांनी 20 नोव्हेंबरला आपले अमुल्य मत देशासाठी द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. या निवडणुकीत 15 हजार 886 अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया घडवून आणणार आहेत. 8 हजार सुरक्षा व पोलीस कर्मचारी असणार आहेत.
20 तारखेला सार्वजनिक सुट्टी – येत्या 20 तारखेला मतदानासाठी सर्व आस्थापनाना शासकीय सुटी देण्यात आली आहे. तसेच खाजगी आस्थापनावरील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना दोन तासाची सुटी मतदानाबाबत देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा उद्योग विभागाने देखील सर्व अत्यावश्यक यंत्रणाना सूचना दिल्या आहेत.
48 तास मद्य विक्री बंद – आज सायंकाळी 6 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर च्या सायंकाळी 6 वाजेपर्यत किंवा मतदान संपेपर्यत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.