नांदेड। येथील नाईक नगर परिसरातील राजीव गांधी कॉलेजच्या मागे नागरी समस्यांनी थैमान घातल्या असून सार्वजनिक नालीचे पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण झाली आहे. या भागातील मुख्य रस्ता हा खोदकाम करून ठेवल्याने ऐन पावसाळ्यात पादचारी नागरिकांना या भागातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असल्यामुळे येथील रहीवाशांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे.
शहरात एकीकडे नागरिकांसमोर विकासाचे चित्र रंगविले जाते आणि दुसरीकडे भलते चित्र समोर येत असून एकेकाळी सुस्थितीत असलेला राजीव गांधी कॉलेजच्या समोरील नाईक नगरचा हा रस्ता प्रशासन तसेच गुत्तेदाराच्या आडमुठे धोरणामुळे आज समस्यांच्या विळख्यात सापडला आहे..
नांदेड शहराची ओळख ही एज्युकेशन हब म्हणून झाली असल्याने या भागातील कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी या परिसरात हॉस्टेलवर किंवा रुमवर राहण्याकरीता असतात या विद्यार्थ्यांना पायी चालतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे..
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये मागील दोन वर्षांपासून प्रशासन आहे. त्यामुळे महानगर पालिकेचे एक धोरण असे म्हणता येईल की , एखाद्या व्यक्तीकडे छोटीशी चुक झाली तरी कायद्यावर बोट ठेवून त्याची वाट लावण्यामध्ये मनपा कर्मचाऱ्यांनी कधी कमतरता ठेवलेली नाही. परंतू त्यांची जबाबदारी त्यांनी कधीच पुर्ण केलेली नाही. याची अनेक उदाहरणे आहेत. ज्यामध्ये रस्ते असतील, पावसाळमुळे साचलेल्या पाण्याचा निचरा असेल, पाणी पुरवठा असेल, मलनिस्सारण व्यवस्था असेल ही अनेक ठिकाणी खचलेलीच आहे.
शारदानगर – नंदीग्राम सोसायटी परिसरही समस्यांच्या विळख्यात
असाच काहीसा भाग आजही शारदानगर ते नंदीग्रमा सोसायटी या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे दिसले नाही आणि अपघात झाले असे असंख्य प्रकार घडले आहेत. परंतू दाद कोणाकडे मागणार. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि आपल्याला झालेल्या अपघाताची जबाबदारी महानगरपालिकेची आहे हे सिध्द करण्याची तयारी ठेवली तर महानगरपालिकेला त्यासाठी बऱ्याच व्यासपीठांवर बोलवता येते अशी प्रतिक्रिया नंदीग्राम सोसायटीचे अध्यक्ष दासराव पाटील पुय्यड यांनी दिली.
तरी महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आदींनी या संदर्भात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा तसेच संबधित कंत्राटदाराश तंबी देऊन लवकरात लवकर काम पूर्णत्वास नेण्यासाठी सक्त सूचना द्याव्यात अशी निर्वाणीची मागणी येथील रहीवाशांनी केली आहे.